देवरी येथे वाघाचा हल्ला, एक गाय जखमी
दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर ः- लाखनी तालुक्यातील किटाडी क्षेत्र सहाय्यक कार्यालय अधिनस्त देवरी गावालगत असलेल्या झुडपी जंगलातील तलाव परिसरातील कक्ष क्रमांक २१३ भागात चराईकरिता नेलेल्या पशुधनावर हल्ला केल्याची घटना मंगळवारी (९ सप्टेंबर) दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. वाघाने केलेल्या हल्ल्यात एक गाय गंभीर जखमी झाली आहे.यामुळे स्थानिक देवरी येथील शेतकरी सोमेश्वर गणपत मारवाडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवरी येथील शेतकरी सोमेश्वर गणपत मारवाडे यांच्या एका गायीवर वाघाने हल्ला केला.या हल्ल्यात गाय गंभीर जखमी झाली.घटनेची माहिती मिळताच पालांदूर येथील पशुवैद्यकीयदवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी पवन पावडे यांनी प्रथमोपचार केले व देवरी बीटाचे वनरक्षक कळंबे यांनी तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
वाघाच्या सततच्या हल्ल्यांमुळे या परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकरी प्रचंड दहशतीत आहेत.आपल्या पशुधनाच्या सुरक्षिततेची चिंता त्यांना सतावते आहे.या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट)तालुका अध्यक्ष संजय खंडाईत यांनी वन विभागाकडे तातडीने वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.वाघाला जेरबंद करून किंवा त्याला सुरक्षित ठिकाणी हलवून शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली भीती दूर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. वन विभागाने या गंभीर घटनेची दखल घेऊन, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







