महिला पुजाऱ्याचा मंदिर समितीकडून अंत्यसंस्कार

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथील जागृत श्रीराम मंदिरात गेल्या १० वर्षापासून वास्तव्यास असलेल्या व मंदिराचे पूजारीपण करणाऱ्या निराश्रीत दुर्गा राजेश्वर फाये वय ६० हिच्यावर तिच्या अचानक झालेल्या निधनानंतर मंदिर समिती व ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकीचा परिचय देत स्वतः अंत्यसंस्कार केले व तिची तेरवीदेखील पूर्ण श्रद्धेने करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला आहे. गेल्या २०-२५ वर्षापूर्वी मध्यप्रदेशातील लांजी येथून साकोली तालुक्यातील पिंडकेपार येथे आलेल्या निराश्रीत दुर्गा फाये हिने अनेक वर्ष इतरांची कामे करून आपला उदरनिर्वाह चालविला होता. दहा वर्षापूर्वी ती येथील जागृत श्रीराम मंदिर समितीच्या संपर्कात आली व मंदिर समितीने या अनाथ स्त्रीला मंदिरातच राहाण्यासाठी एक छोटीशी खोली मोफत दिली व तिच्याकडे पूजारीन पद दिले. शिवाय तिच्या पोटापाण्यासाठी दरमहा काही रोख रक्कम देण्याची व्यवस्था केली. तिच्या मागेपुढे कोणीही नातेवाईक नसल्याने अनेक वर्ष ती या मंदिरातच मंदिर समितीच्या आधाराने जगत होती. दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे या ६० वर्षीय वृद्ध पूजारीन दुर्गा फायेचे अल्पआजाराने निधन झाले.

ही बातमी कळताच मंदिर संस्थानचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी सामाजिक बांधिलकीचा परिचय देत संपूर्ण रितीरिवाजाप्रमाणे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. शोकाकूल वातावरणात तिची अंत्ययात्रा सकाळी १०.३० वाजता मंदिर परिसरातून काढली व त्यानंतर तिची तेरवी देखील वर्गणीच्या माध्यमातून करण्याचा निर्धार मंदिर संस्थानच्या कार्यकर्त्यांनी केला. याप्रसंगी संस्थानचे अध्यक्ष शरद भुजाडे, उपाध्यक्ष शिवचरण वडीकार, सचिव योगेश चांदेवार, सदस्य अंगराज समरीत, हरिभाऊ समरीत, तीर्थराम शाहारे महाराज, बाळकृष्ण बावणकुळे, प्रल्हाद लेदे, पतीराम निंबेकर, भारत वडीकार, मधुकर समरीत, संजय वैद्य, होमराज समरीत, बंटी कावळे, प्रशांत समरीत, पुरुषोत्तम येरणे, सुरेश कवरे, राजकुमार मळकाम, चंद्रकुमार समरीत, कृष्णा समरीत, प्रेमविलास भुजाडे, उमेश समरीत, रामेश्वर भुजाडे, विनोद यावलकर, ताराचंद लंजे, धनंजय यावलकर, निलेश दे. समरीत, दिनेश भानारकर, निलेश म. समरीत यांनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *