खासदाराच्या जनता दरबारात दीडशे प्रकरणांचा निपटारा
खा. डॉ. प्रशांत पडोळे यांचा धडाकेबाज जनता दरबार
दै. लोकजन वृत्तसेवा
सिहोरा:- भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वाखाली काल २१ नोव्हेंबर रोजी सिहोरा ग्रामीण सचिवालयाच्या भव्य पटांगणावर प्रभावी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले. सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनातील प्रश्न, प्रशासकीय अडचणी आणि विकासाशी निगडित विविध मागण्या थेट लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या जनता दरबाराला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच ग्रामीण सचिवालयाच्या परिसरात आपले पत्र व निवेदने घेऊन मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
या जनता दरबारामध्ये विविध प्रकारच्या सुमारे १५० तक्रार अर्ज नागरिकांकडून प्राप्त झाले. खासदार प्रशांत पडोळे यांनी प्रत्येकाचे म्हणणे अत्यंत शांतपणे, संवेदनशीलतेने आणि लक्षपूर्वक ऐकून घेतले. नागरिकांच्या तक्रारी केवळ कागदावर न ठेवता त्यांना तात्काळ न्याय मिळावा, यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी थेट घटनास्थळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांसमोरच समस्यांचे स्वरूप स्पष्ट करून अनेक तक्रारींचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
उपस्थित नागरिकांमध्ये समाधानाचे आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. ज्या तक्रारी व मागण्या शासकीय धोरण, निधी किंवा उच्च स्तरावरील निर्णयांच्या अखत्यारीत येतात, त्याबाबत खासदार पडोळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. हे प्रश्न शासन दरबारी मांडून त्यांचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल आणि ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी हमी नागरिकांना दिली. कोणताही प्रश्न प्रलंबित राहू नये आणि प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता व वेग यावा यासाठी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही देण्यात आल्या.
सर्वसामान्य माणसाच्या अडचणींना थेट वाचा फोडणारा व प्रशासकीय यंत्रणेला कामाला लावणारा आणि जनतेमध्ये नवा विश्वास निर्माण करणारा हा जनता दरबार परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला. लोकप्रतिनिधी थेट जनतेच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या सोडवतात हे आज सिहोरा येथे पाहायला मिळाले. या उपक्रमामुळे स्थानिक प्रश्नांना गती मिळण्याबरोबरच जनतेचा प्रशानावरील विश्वास अधिक दृढ होण्यास मदत झाली आहे.
या जनता दरबाराच्या मंचावर खासदार प्रशांत पडोळे यांचे सह कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसरचे संचालक अ. कलाम शेख, रमेश पारधी, कृष्णा बनकर, गढीराम बांडेबुचे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तर पोलीस स्टेशन सिहोराचे ठाणेदार विजय कसोधन हे सुद्धा आपल्या पोलीस चमू सह पाळत ठेवून होते.









