विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थान कोरणीच्या वतीने पत्रकार परिषद; यात्रेच्या कार्यक्रमांची माहिती

गोंदिया (लोकजन वृत्तसेवा) :- विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानच्या वतीने आयोजित यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजक केतन शिवशंकर तुरकर यांनी यावर्षी होणाऱ्या यात्रेच्या कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.
पत्रकार परिषदेला संस्थानचे अध्यक्ष गोवर्धन पटले, सचिव केतन शिवशंकर तुरकर, कोषाध्यक्ष नूतनलाल तुरकर व सहसचिव टेकचंद तुरकर उपस्थित होते.
यात्रेच्या पहिल्या दिवशी, २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता विठ्ठल हरिपाठ भजन मंडळाच्या वतीने हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता प्रज्ञापीठ, गोंदिया यांच्या वतीने हवन-पूजन होणार असून, संध्याकाळी ७ वाजता भव्य माँ गंगा महाआरती आयोजित करण्यात आली आहे.
महाआरतीला प्रमुख अतिथी म्हणून राज्यसभा खासदार माननीय प्रफुल्ल पटेल, राज्यसभा खासदार माननीय राजेंद्र जैन, अर्जुनी-मोरगावचे आमदार माननीय राजकुमार बडोले, गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, कटंगी-खैरलांजीचे आमदार माननीय गौरव सिंह पारधी व लांजीचे आमदार माननीय राजकुमार कराहे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
महाआरतीनंतर रात्री ८ वाजता शाहिरीचा जंगी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात शाहीर विजय कटरे व शाहीर विजय बिसेन सहभागी होणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. सुरेश हर्षे , अध्यक्षस्थानी मुनेशजी रहांगडाले , तर प्रमुख अतिथी म्हणून जिला परिषद सदस्य श्रीमती नेहा तुरकर, श्री. राज शुक्ला व माननीय रोकेश कल्लू यादव उपस्थित राहणार आहेत.
२५ नोव्हेंबर रोजी हरि विठ्ठल दंडार मंडळ व आदर्श तरुण सेवा दंडार मंडळ यांच्या वतीने दंडारीचा जंगी मुकाबला आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमातून पारंपरिक लोककलेचा आनंद नागरिकांना घेता येणार आहे.
यात्रेतील सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गंगा महाआरती व विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक केतन शिवशंकर तुरकर यांनी पत्रकार परिषदेत केले.









