जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाचा शेतीला फटका
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून काल दिवसभर रिमझिम पाऊस सुरू होता. या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील कापणी केलेले धान शेतातच पडून असून आधारभूत खरेदी केंद्रातही उघड्यावर पडलेल्या धानाचे नुकसान होत आहे. दुष्काळाच्या सावटात असलेल्या जिल्ह्याला आता अवकाळीची भर पडल्याने निसर्गाच्या लहरीपणापुढे शेतकरी हतबल झाला आहे.
जिल्ह्यात धान कापणी अंतिम टप्प्यात आहे. लाखांदूर, साकोली, तुमसर, पवनी, लाखनी, मोहाडी आणि भंडारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी धान कापून शेतातच कळपा (पंजी) रचून ठेवले आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे काही शेतकऱ्यांनी ताडपत्री, प्लास्टिक टाकून कळपा वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेक शेतकऱ्यांचे कळपा ओले झाले आहेत. ओले झाल्याने धानात ओलावा वाढून धानाला कोंब फुटण्याची आणि धान काळे पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
एकंदरीत, खरीपात कमी पाऊस, त्यानंतर परतीच्या पावसाचा खंड आणि आता कापणीच्या तोंडावर आलेल्या अवकाळी पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.
आधारभूत केंद्रातील धानही उघड्यावर
धक्कादायक बाब म्हणजे शेतातीलच नव्हे, तर शासकीय आधारभूत खरेदी केंद्रातही खरेदी केलेले हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. भंडारा आणि तुमसर येथील खरेदी केंद्रात बारदाना आणि शेडअभावी धान उघड्यावर ठेवण्यात आले आहे. कालच्या पावसात हे धान पूर्णपणे भिजले असून त्याची प्रत खालावली आहे. यामुळे हमीभावापेक्षा कमी दर मिळण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तात्काळ धान सुरक्षित गोदामात हलविण्याची मागणी होत आहे.
कीड व रोगांचा धोका वाढला
हवामान खात्याच्या मते, पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार आहे. दमट हवामानामुळे धानावर कडा करपा, भाजीपाल्यावर करपा आणि तुरीवर शेंगा पोखरणारी अळी वाढण्याची दाट शक्यता आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना फवारणी घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
भाजीपाला, तूर आणि फळबागांनाही फटका
या अवकाळी पावसाचा फक्त धानालाच नव्हे, तर इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर या भाजीपाला पिकांवर पाणी साचल्याने मूळ कुजण्याची शक्यता आहे. सध्या तूर पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सततच्या ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. संत्रा, मोसंबी, पपई या फळबागांनाही या पावसाचा फटका बसत आहे. फळांवर डाग पडून गळ होण्याची आणि बुरशीजन्य रोग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे फळ उत्पादक शेतकरीही चिंतेत आहे.









