सेंदूरवाफा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त रथयात्रा आज

रथयात्रेचे ८१ वे वर्ष राकेश बैस साकोली (दै. लोकजन) :- परमपूज्य ह.भ.प.स्व. सिताराम महाराज यांच्या आशीर्वादाने त्यांच्या कारकिर्दीत सुरू झालेली व श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान सेंदूरवाफा यांच्या वतीने गत ८१ वर्षांपासून अविरत सुरू असलेली कार्तिक पौर्णिमेनिमित्तची पंचक्रोशीत सुप्रसिद्ध असलेली श्री विठ्ठल रुक्मिणीची भव्य दिव्य रथयात्रा यंदा देखील त्याच उत्साहाने दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोज मंगळवारला आयोजित करण्यात आली आहे. त्याच दिवशी येथील झेंडा चौकात भव्य मंडई व रात्री भव्य खंजरी भजन स्पर्धेचे देखील आयोजन केले आहे तसेच दुपारी ह.भ.प. मंगलमूर्ती शिवणकर महाराज इंजोरी यांचे कीर्तनाचा भाविकांना लाभ मिळेल.

भजन स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटात आयोजित केली असून दोन्ही गटांसाठी आकर्षक रोख बक्षिसे ठेवली आहेत. शिवाय रथयात्रेच्या स्वागतासाठी भव्य रोषणाईने सजविलेल्या प्रवेशद्वारासाठी देखील वीस हजार रुपयांपासून सात हजार रुपयांपर्यंत आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सायंकाळी ७ वाजता रथाचे विधिवत पूजन केले जाईल. तसेच रात्री ९ वाजता भजनस्पर्धेचे उदघाटन केले जाईल. यावेळी आ. नाना पटोले,

आ. अविनाश ब्राम्हणकर, माजी आ. बाळा काशिंवार, नगराध्यक्ष देवश्री कापगते, उपाध्यक्ष रोहिणी मुंगुलमारे, तहसीलदार निलेश कदम, उपविभागीय पो. अधिकारी शिवम विसापुरे, मुख्याधिकारी मंगेश वासेकर, डॉ. राकेश बोरकर, ठाणेदार नितीन राठोड, पंकज मुंगुलमारे नगरसेवक, पो. पा. अरविंद निंबेकर, माजी सभापती पद्माकर गहाणे व सर्व आजी माजी नगरसेवक आदी उपस्थित राहतील.

रथयात्रेच्या स्वागतासाठी संपूर्ण गावात सजावट युक्त मोठमोठी प्रवेशद्वारे उभारली जातात. तसेच विविध ठिकाणी भव्य दिव्य उद्बोधनपर रांगोळ्या टाकल्या जातात. रथयात्रेचा शुभारंभ श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून होतो. त्यानंतर भाविकांच्या प्रचंड गर्दीतून दर्शन देत रथ संपूर्ण गावातून फिरत

झेंडा चौकात येतो. रथाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून भाविक एकत्र येतात. रथ यात्रेच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण सेंदूर वाफावासी प्रचंड मेहनत घेत आहेत. भाविकांनी रथ दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कमेटीचे अध्यक्ष ऋषी कापगते, उपाध्यक्ष चुन्नीलाल हातझाडे, सचिव श्रावण बोरकर व एकादशी लांजेवार (सिताराम महाराज यांची मुलगी) व सर्व पुरुष व महिला भजनी मंडळ सेंदूरवाफा यांनी केले आहे.

या यात्रेला धार्मिक महत्त्व तर आहेच परंतु या यात्रेत या गावातील मुली मग त्या कितीही वयाच्या असोत रथयात्रेच्या दिवशी भाऊबीज साजरी करतात व यानिमित्त शेंदूरवाफा येथील सर्व बहिणी आपल्या माहेरी उपस्थित असतात, असे मत नगरसेवक पंकज मुंगुलमारे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *