मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात खैरी/वलमाझरी ग्रामपंचायतीची चमकदार कामगिरी

नागपूर विभागात द्वितीय, महसूलमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते मिळाले ८० लाखांचे बक्षीस

दै. लोकजन वृत्तसेवा

साकोली :- मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील गट ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी हिने अष्टपैलू व सर्वंकष कामगिरीच्या जोरावर नागपूर विभागस्तरीय द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामपंचायतीला ८० लाख रुपयांच्या पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले आहे. दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी नागपूर येथे आयोजित भव्य विभागस्तरीय समारंभात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री योगेश कदम आणि अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हे पारितोषिक प्रदान करण्यात आले. यावेळी माजी सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांच्या वतीने सौ. हर्षा रुखमोडे, सभापती ललित हेमने, उपसभापती करुणा थालदे, गट विकास अधिकारी पुंडलिक जाधव यांच्यासह ग्रामप्रतिनिधींनी हा सन्मान स्वीकारला.

ग्रामपंचायतीने स्वतःची अद्ययावत वेबसाईट आणि आपले सरकार सेवा केंद्र कार्यान्वित करून १४२ दाखले व २१७ नागरिक सेवा अर्जांचा १०० टक्के निपटारा केला आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी ४८ ठिकाणी ८४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून २७४६ पात्र नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड आणि ३४ दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड वितरित केले आहेत. आर्थिक सक्षमीकरणात क्यूआर कोड आणि ऑनलाईन प्रणालीचा वापर करून ११.६४ लाख रुपये घरपट्टी आणि ३.९० लाख रुपये पाणीपट्टीची १०० टक्के वसुली करण्यात आली. ग्रामस्थांनी ५.४९ लाख उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ६.४६ रुपये लोकवर्गणी जमा करून त्यातून धोबीघाट, अभ्यासिका, अंगणवाडी पेव्हर ब्लॉक, पवनचक्की व जलविद्युत केंद्र उभारले. पर्यावरण आणि विकासाचा समतोल साधले.

गावाचा पाण्याचा ताळेबंद मांडून ६३२ कुटुंबांना १०० टक्के नळजोडणीद्वारे शुद्ध पाणीपुरवठा दिला जात आहे. ९ शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग, १२०० झाडांना ठिबक सिंचन, २५ घरकुले, १३७ घरे, ४ शाळा, ४ अंगणवाड्या आणि ७२ कृषी पंप सौर ऊर्जेवर आणण्यात आले आहेत. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात २०० पैकी १७७ गुण मिळवत ओला-सुका कचरा विलगीकरण आणि सांडपाणी व्यवस्थापन यशस्वी केले आहे. मनरेगा व विविध योजनांच्या अभिसरणातून ६९ घरकुले, १८०० मीटर गावांतर्गत व १६०० मीटर पाणंद रस्ते पूर्ण करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतीने १०५६ महिला मतदारांना ४८ बचत गटात आणून सर्वांना ‘लखपती दीदी’ बनविले असून ३ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आहेत. गाव ‘ॲनिमिया मुक्त’ घोषित करण्यात आले आहे. ‘१०० टक्के कर वसुलीसाठी नागपूर-हैदराबाद विमान प्रवास, नागझिरा सफारी’, ‘सखी संगम धोबीघाट’, ‘हरित ग्राम भाजी क्रांती’, कॅनलवरील ‘जलपुनर्नायन’ प्रयोग, विधवा महिलांसाठी ‘सन्मानाची चादर’, ‘अंत्यसंस्कार जलसहाय्य’, ‘सावित्री प्रेरणा अध्ययन हब’, हॉट एअर बलूनद्वारे ‘गगनझेप पर्यटन’ आणि ‘घटकृपा’ मोफत थंड पाणी योजना यांसारख्या अभिनव उपक्रमांनी राज्याचे लक्ष वेधले आहे.

हे यश माजी सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांच्या नेतृत्वात आणि ग्रामपंचायत अधिकारी नरेश शिवणकर यांच्या प्रशासकीय समन्वयातून, ग्रामस्थांचे श्रमदान, लोकवर्गणी आणि प्रशासनाच्या मार्गदर्शनातून मिळाले असल्याचे सांगण्यात आले. या ८० लाखांच्या निधीतून गावाचा विकास अधिक वेगाने करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *