जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय वाढविण्याकरीता उपाययोजना करा
विधान परिषदेचे भाजप आमदार डॉ. परिणय फुके यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात भंडारा गोंदियाआणि भंडारा जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाबाबत महत्वाचा प्रश्न उपस्थित केला. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील १३३ मत्स्यव्यवसाय संस्था बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने या मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या लाखो कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येऊन त्यांना रोजगारासाठी गावोगावी भटकावे लागत असल्याची बाब डिसेंबर, २०२४ मध्ये निदर्शनास आली आहे का असा प्रश्न डॉ. फुके यांनी उपस्थित केला. तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मत्स्योत्पादन प्रोत्साहनपर अनुदान देण्याबाबत आणि मत्स्यव्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने शासनामार्फत कोणती कार्यवाही आणि उपाययोजना केली जाते आहे
याबाबत माहिती देण्याबाबतही विचारण्यात आले. त्यावर बोलताना मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सविस्तर उत्तर दिले. मत्स्यव्यवसाय विभागाकडील ६४ तलाव ३ जुलेै २०१९ च्या शासन निर्णयानुसार मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मासेमारीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील एकूण १४४ मालगुजारी तलाव, जिल्हा परिषद, गोंदिया यांचेकडून मत्स्यपालन सहकारी संस्थेस प्राधान्याने मासेमारीसाठी ठेक्याने देण्यात आलेली आहेत, अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी सभागृहाला दिली. तसेच गोंदिया व भंडारा जिल्ह्यात बांध पध्दतीद्वारेपावसाळ्यात मत्स्यप्रजनन करुन मत्स्यबीज निर्मिती करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन दिले जाते आहे.
त्यासाठी वर्ष २०२२२३ मध्ये बांध प्रजननासाठी उपयोगी असणाऱ्या साहित्याचा पुरवठा ९ संस्थांना मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत ८.९७ लाख रूपयांचा लाभ देण्यात आला होता, अशीही माहिती राणे यांनी सभागृहात दिली. तसेच जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना मासेमारीसाठी आवश्यक असणारे मासेमारी जाळे आणि नौका अनुदानावर खरेदीसाठी मासेमारी साधनांच्या खरेदीवर अर्थसहाय्य योजनेंतर्गत ५० टक्के अनुदानाने स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासाठी २०२४-२५ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण योजनेंतर्गत २१ लाख रुपयांची तरतूद जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अर्थसंकल्पित असून त्याचा लाभ गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील मच्छिमारांना होणार आहे, असे सांगितले.