घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली रेती माफीयांचा चुलबंद नदीपात्रात धुमाकूळ
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- साकोली तालुक्यातील उमरी येथे घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती योजनेच्या मार्फत शासनाच्या वतीने उमरी व महालगाव येथील चुलबंद नदी घाटातून रेतीच्या उपसा सुरू आहे. यात बोगस लाभार्थ्यांची संख्या जास्त असल्याचा आरोप ग्रामपंचायत उमरीचे सरपंच यशवंत कापगते व ग्रामपंचायत सदस्य यांनी केला असून जिल्हाधिकारी भंडारा यांना याबाबत तक्रार सुद्धा करण्यात आली आहे. घरकुल लाभार्थ्यांना निशुल्क रेती मिळावी व यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये याकरिता महसूल प्रशासनाच्या वतीने उमरी नदी घाटावर महसुल विभागाचे कर्मचारी व पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परंतु प्रशासनाच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांची यादी लांबलचक असून यात २०१६ पासूनच्या घरकुल लाभार्थ्यांची यादी आहे. परंतु वास्तविक पाहता महसूल विभागाने दिलेली यादी खूप जुनी असून यात बऱ्याच लोकांचे घरकुल बांधकाम पूर्ण झालेले आहे.
ज्या लोकांनी बांधकाम पूर्ण केले आहे अशा लोकांच्या नावाचा रेती माफिया वापर करत असून खरे लाभार्थी रेती पासून वंचित असून बोगस लाभार्थी यांच्या नावे रेती उपसा करून बाहेर खाजगी लोकांना विकली जात आहे. याची माहिती मिळताच ग्रामपंचायत उमरीचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी घटनास्थळावर मोका चौकशी केली असता निःशुल्क रेती योजनेत मोठ्या प्रमाणावर घोळ होत असल्याचे लक्षात आले. याबाबत त्यांनी तहसीलदार साकोली यांच्याशी चर्चा केली व त्यांच्या निदर्शनात ही बाब आणून दिली. तसेच ग्रामपंचायतने याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी भंडारा यांना केली असून या निष्पक्ष चौकशी करून खऱ्या लाभार्थ्यांना रेती देण्याची मागणी सरपंच यशवंत कापगते व ग्रामपंचायत सदस्य यांनी केली आहे.
साकोली तालुक्यातील ५१ गावातील ६ हजार घरकुल लाभार्थांची यादी आहे व त्यांना प्रति घरकुल ५ ब्रास असे एकून ३० हजार ब्रास रेती वाटप करण्याचे जिल्हाधिकारी भंडारा या यादीतील ७०% टक्के नावे ही ६ ते ७ वर्षा पूर्वीपासून मंजूर असलेले व बांधकाम पूर्ण झालेले लाभार्थांची नावे आहेत. सदर लाभार्थाना रेती वाटप करण्याचा प्रश्नच येत नाही. तथापी रेती माफिया हे यादीतील घरकुल लाभार्थाचे आधार कार्ड दाखवून बाहेर नेवून रेतीचा साठा करत आहेत व तसेच इतरत्र रेती विकत आहेत.
दर दिवशी १५० ते २०० ब्रास जात असलेली रेती ज्या घरकुलांसाठी वितरीत करण्यात येत असलेली रेती त्याच घरकुलापर्यंत पोहचत आहे की नाही याची तपासणी ग्रामसेवक तथा तेथील तलाठी किंवा प्रशासकीय यंत्रणा यांच्या मार्फत करण्यात यावी. ज्या ट्रॅक्टर धारकांनी हा रेतीचा गोरख धंदा सुरु केला आहे. त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. असे स्वाक्षऱ्यांसह निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. सदर सुरू असलेल्या उमरी रेती घाटात एकोडी पासून ट्रॅक्टरलागलेले आहेत. घरकुल लाभार्थ्यांचे आधार कार्ड लाऊन या शासकीय महसुली वाळूचा कुठेतरी निर्जनस्थळी रेती गोळा करून डम्पिंग तर केली जात नाहीअशी दाट शंका ग्रामपंचायत कमिटी व उमरी वासीयांनी व्यक्त केली असून यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी ग्रामपंचायत उमरीतील पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आहे.