जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत १२ जागेसाठी ५० उमेदवार
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जिल्हा दूध उत्पदक सहकारी संघाची निवडणूक २८ जून रोजी होणार आहे. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. छाननीनंतर २ जून रोजी प्रकाशित झालेल्या उमेदवारांच्या वैध सूचीमध्ये आता रिंर्गणात ५० उमेदवार आहेत. १६ जून ही नामांकन परत घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतरच या निवडणुकीतील खरे चित्र स्पष्ट होणार आहे. विशेष म्हणजे येथे फक्त १२ संचालक निवडून द्यायचे आहेत तर फक्त १६९ मतदार आहेत. जिल्हा दूध उत्पादक संघावर सध्या काँग्रेसची सत्ता आहे. रामलाल चौधरी हे अध्यक्ष आहेत. यावेळी मात्र बरीच रस्सीखेच सुरू आहे.
नामांकन परत घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर दबावतंत्र, प्रलोभनांचा वापर होण्याची शक्यता आहे. नामांकन परत घेण्यासाठी अवधी बराच अधिक असल्याने सहकारातील नेत्यांची डोकेदुखी मात्र वाढणार आहे. सहकाराच्या राजकारणात महत्त्वाची असलेली ही संस्था जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी थेट संबंध ठेवून असल्याने या संस्थेच्या निवडणुकीवर सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे.
निवडणूक २८ जून रोजी होणार आहे. महिलासाठी २ पदे राखीव असून ९ उमेदवार, भविजा/ज साठी १ पद राखीव असून ३ उमेदवार, अजा/अज साठी १ पद राखीव असून ३ उमेदवार, इमाव साठी १ पद राखीव असून ५ उमेदवार तर सामान्य प्रतिनधीसाठी ७ पद राखीव असून ३० उमेदवार रिंर्गणात आलेत. नामांकन मागे घेतल्यानंतर खरी लढत स्पष्ट होणार आहे.