मजुरांच्या वाहनाला अपघात, १२ मजूर जखमी
दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- मजुरांना घेऊन जाणारे वाहन अनियंत्रीत झाल्याने झालेल्या अपघातात दहा ते बारा मजूर जखमी झाले आहेत. हा अपघात देव्हाडा ते करडी मार्गावर आज दि. ४ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडला. रेती घाटावर काम करणाऱ्या मजुरांना घेऊन सुमो वाहन कोका येथे जात होते. दरम्यान मानस साखर कारखान्याच्या समोर वळणावरील रस्त्यावर वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली उतरून अपघातग्रस्त झाले.
या वाहनातील दहा ते बारा मजुरांना किरकोळ आणि काही मोठ्या स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. अपघाताची माहिती कळताच आजुबाजुचे लोकांनी अपघातस्थळी धाव घेतली. गाडीत फसलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले. सर्वांना उपचारासाठी जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आल्यानंतर सुट्टी देण्यात आली. या मार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत असता. अशावेळी या मार्गावर गतिरोधक उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.