एकोडीत विजेअभावी करपली धानशेती
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- एकोडी जिल्हा परिषद क्षेत्रात आठवड्यातून ६० तासांहून जास्त कालावधीत लोडशेडिंग असते. त्यामुळे धानपीक करपणे सुरू झाले आहे. संतापलेले शेतकरी आज, बुधवारी साकोलीच्या महावितरण कार्यालयासमोर धडकले. उपकार्यकारी अभियंता, तहसीलदार यांना निवेदन देऊन शेतीला नियमित वीजपुरवठा करण्याची मागणी केली. बाम्पेवाडा, आतेगाव, उमरझरी, निपरटोला, चांदोरी, पळसपाणी येथील शेतकऱ्यांचा यात समावेश होता.
या परिसरात दुबार पीक म्हणून धानाला लागवड केली जाते. बऱ्याच शेतात कृषीपंपाने पाणीपुरवठा केला जातो. परंतु, गेल्या दोन महिन्यापासून आठवड्यातून सुमारे ४८ तासलोडशेडिंग केली जाते. शिवाय एखादा फेस गेल्यास रात्रभर सुमारे १२ तास लाईट बंद असते. पाणी खोल गेल्याने विद्युत पंपाला खूप कमी पाणी येते. त्यामुळे पिकांना पाणी अपुरा होत आहे. एकोडी परिसरात मोठे तलाव, नहर यांची सिंचनासाठी व्यवस्था नाही. एकोडी फीडरचे अभियंता शेतकऱ्यांशी अरेरावीने वागतात. त्यामुळे संबंधित परिसरातील शेतकऱ्यांनी या अभीयंत्याच्या बदलीची मागणी केली आहे. नियमित वीज पुरवठा न केल्यासयेत्या तीन दिवसांत धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.