
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा जि. प.अंतर्गत कार्यरत शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. जिल्ह्यामध्ये जि. प. च्या बत्तीस हायस्कूल असून अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकाची पदे रिक्त आहेत. त्या पदोन्नतीने भरणे. त्याचप्रमाणे प्राथमिक विभागात उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख इत्यादी रिक्त पदेसुद्धा पात्र शिक्षकांमधून पदोन्नतीने भरणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती व इतर प्रलंबित देयके प्राधान्याने निकाली काढणे, सेवानिवृत्त होत असलेल्या शिक्षकांचे पि. पि. ओ. मंजूर करणे, २००३ साली लागलेल्या शिक्षकांची डिसीपीएस खात्यातील रक्कम जीपीएफ खात्यात वळती करणे, निवडश्रेणी व वरिष्ठश्रेणीची ची प्रकरणे निकाली काढणे, घड्याळी तसिकेवरील शिक्षकांचे मानधन अदा करणे, २०१४ पासूनच्या शिक्षकांना वेतनश्रेणी लागू करणे अशा अनेक समस्या निकाली काढण्याविषयी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. उपरोक्त सर्व विषय निकाली काढण्याबाबतचा सकारात्मक प्रतिसाद मुख्यकार्यपालन अधिकारी जि. प. भंडारा यांनी दिला. निवेदन देताना जनता शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष डॉ. उल्हास फडके, जिल्हा पालक कैलास कुरंजेकर, जिल्हाध्यक्ष अरविंद बाराई, सचिव महादेव साटोने, सहसचिव महेश यावलकर, उपाध्यक्ष मनोहर पारधी, डॉ. युवराज खोब्रागडे, डॉ. चोपराम गडपायले, सुनिल सोनकुसरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.