पाच गावांत महिलांचा दारूबंदीचा एल्गार! राजगुडा परिसरात जनजागृती रॅली; नऊ विक्रेत्यांनी दारूविक्री बंद करण्याची मागणी
व्यसनाधीनतेमुळे कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याची महिलांची व्यथा
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- दारूच्या व्यसनामुळे संसाराची होणारी वाताहात, घरगुती हिंसाचार आणि आर्थिक संकटांनी त्रस्त झालेल्या महिलांनी आता दारूबंदीचा निर्धार केला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील राजगुडा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या राजगुडा, सलगंटोला, मंदीटोला, मोठा मोगरा आणि छोटा मोगरा या पाच गावांमध्ये महिलांनी एकजूट दाखवत दारूबंदीच्या मागणीसाठी जनजागृती रॅली काढली. गावागावांत दारूविक्री बंद करून व्यसनमुक्त वातावरण निर्माण करण्याचे आवाहन या माध्यमातून करण्यात आले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२६-२७ अंतर्गत राबवण्यात आलेल्या या उपक्रमात उमेद समूहातील महिला, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. दारूबंदीच्या समर्थनार्थ घोषणा देत महिलांनी गावांमधून रॅली काढली. दारूच्या व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक समस्यांकडे लक्ष वेधत नागरिकांनी नशेपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले.
२०११ च्या जनगणनेनुसार, या पाच गावांची एकूण लोकसंख्या सुमारे दोन हजार आहे. गावांमध्ये काही व्यक्तींकडून दारूविक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महिलांनी ही मोहीम हाती घेतली आहे. दारूविक्रीमुळे गावातील सामाजिक स्वास्थ्य बिघडत असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.
व्यसनामुळे संसाराची घडी विस्कटते
दारूच्या व्यसनाचा सर्वाधिक फटका महिलांना आणि मुलांना बसत असल्याचे या मोहिमेतून अधोरेखित झाले. दारू पिऊन घरी येणारे पुरुष व्यसनासाठी पैसे नसल्यास घरातील जीवनआवश्यक वस्तूही विकतात. नशेत पत्नी आणि मुलांशी मारहाण केली जाते. परिणामी, कुटुंबातील शांतता नष्ट होऊन महिलांना मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी महिलांनी एकत्र येत दारूबंदीची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
तरुणांच्या भविष्याचीही चिंता
गावातील तरुणांचे विवाहयोग्य वय झाले असून त्यांच्या विवाहासाठी कुटुंबाकडून स्थळांचा शोध घेतला जात आहे. मात्र, तरुण वयातच दारूचे व्यसन लागल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनावर आणि भविष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आदिवासी समाजासह सर्व समाजांतील तरुणांना व्यसनापासून दूर ठेवणे आवश्यक असल्याचे उपसरपंच लेखलाल टेकाम यांनी सांगितले. गावात नऊ जण दारूविक्री करीत असल्याचा दावा करत त्यांनी संबंधितांनी दारूविक्री बंद करावी, असे आवाहन केले.
या उपक्रमात रेखा लेदे यांच्यासह उमेद समूहातील महिला आणि ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घेतला. शांता संयम, अरुण लेदे, वर्षा लाडे, अनिता लेदे, देवानंद गेडाम, रंजू पटले, पुष्पमाला पंचभाई, शिल्पा मेश्राम, सीमा घासले, पुरनलाल कोडापे, डी. एच. पटले, सरपंच सुषमा मस्कोल्हे, उपसरपंच लेखलाल टेकाम, संघपाल वैद्य, लिकु मडावी, लता कडपते, कुंदा पटले आणि सीमा पटले यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. दारूबंदीचा हा पुढाकार केवळ दारूविक्री रोखण्यापुरता मर्यादित नसून, महिलांची सुरक्षितता, मुलांचे भविष्य आणि गावातील सामाजिक सलोखा जपण्याच्या दिशेने उचललेले पाऊल ठरत आहे. आता या जनजागृतीला ग्रामस्थांचा किती व्यापक पाठिंबा मिळतो आणि प्रत्यक्षात दारूविक्रीला कितपत आळा बसतो, याकडे लक्ष लागले आहे.








