२६ वर्षांनंतरही गुरु-शिष्याचे नाते कायम

महिला महाविद्यालय तुमसरमध्ये २००० च्या माजी विद्यार्थिनींकडून प्राध्यापकांचा हृदयस्पर्शी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा

तुमसर :- काळ बदलला, पिढ्या बदलल्या पण गुरु-शिष्याचे नाते आजही तसेच अटूट आहे, याचा जिवंत प्रत्यय महिला महाविद्यालय, तुमसर येथे पाहायला मिळाला. सन २००० साली याच महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थिनींनी तब्बल २६ वर्षांनंतर एकत्र येऊन आपल्या गुरुजनांचा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात आणि डोळ्यात पाणी आणणाऱ्या वातावरणात पार पाडला.

हा हृदयस्पर्शी सोहळा दि. २४ ऑक्टोबर २०२६, शनिवार रोजी सकाळी १०:३० वाजता महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. या सोहळ्यासाठी सर्व प्राध्यापक वर्गाला सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य सेलोकर होते, तर उपाध्यक्ष म्हणून विनोद तितिरमारे यांनी स्थान भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून महिला महाविद्यालयाचे सचिव प्रमोद तितिरमारे, सोमनाथे, कुरेशी, थुल, मेश्राम, वालदे, चौहान, चोपकर, सिरसाम, गभणे, देवेंद्र मंडपे, अभय राखडे, राऊत व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या टाळ्यांच्या गजरात आणि फुलांच्या वर्षावात सर्व गुरुजनांचे स्वागत करण्यात आले.

या सोहळ्याच्या आयोजक माजी विद्यार्थिनी निलिमा अंबुले, शालिनी बागडे, सारिका बेलेकर, छबिता लांजेवार, करूणा भुतांगे, रोशनी माटे, ललिता नवखरे, प्रीती शेंडे यांनी सर्वांचे मन जिंकले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सेलोकर यांनी आपल्या मार्गदर्शनात भावनिक होत सांगितले, “आजचा दिवस माझ्या जीवनातील अविस्मरणीय दिवस आहे. शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांना घडवतो, पण २६ वर्षांनंतर तेच विद्यार्थी आपल्याला शोधून असा सन्मान देतात, यापेक्षा मोठे भाग्य शिक्षकाचे नाही. २००० साली जेव्हा तुम्ही शिकत होतात, तेव्हा साधने कमी होती, पण जिद्द मोठी होती. आज तुम्ही सर्वजणी आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालात, याचा आम्हाला अभिमान आहे. हे महाविद्यालय केवळ इमारत नाही, तर संस्कारांचे माहेरघर आहे, आणि तुम्ही आज ते सिद्ध केले आहे. तुमचे हे प्रेम असेच कायम राहो.”

कार्यक्रमाची धुरा सांभाळणाऱ्या आणि आयोजकांपैकी एक असलेल्या माजी विद्यार्थिनी प्रीती शेंडे यांनी आपल्या मनोगतात सर्वांना भावूक केले. त्या म्हणाल्या, “आज २६ वर्षांनंतर या व्यासपीठावर उभे राहून बोलताना माझ्या अंगावर काटा येत आहे. ज्या बेंचवर आम्ही बसलो, ज्या वर्गात आम्हाला मॅडम-सरांनी घडवले, त्याच ठिकाणी आज आम्हाला त्यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली, हे आमचे भाग्य आहे. तेव्हा मोबाईल नव्हते, व्हॉट्सॲप नव्हते, पण गुरूंनी दिलेले संस्कार होते. त्या संस्कारांच्या जोरावरच आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. हा सत्कार म्हणजे केवळ फुल-माळा नाही, तर आमच्या कृतज्ञतेची छोटीशी पोचपावती आहे. आमच्या सर्व मैत्रिणींच्या वतीने मी सर्व गुरुजनांना वंदन करते.” त्यांच्या या शब्दांनी उपस्थित सर्व गुरुजनांचे डोळे पाणावले.

उत्साहाचे वातावरण

या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. जुन्या आठवणींना उजाळा देत, हास्य, अश्रू आणि सन्मानाच्या भावनेने हा भव्य सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तुमसरच्या शैक्षणिक इतिहासात हा सोहळा एक सुवर्णपान म्हणून लिहिला जाईल, अशी चर्चा सर्वत्र आपल्या जिल्ह्यात सुरू राहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *