श्रीराम मित्र मंडळ, भंडारा यांचा २० वा वर्धापनदिन व १०५२ वा संगीतमय सुंदरकांड सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- श्रीराम मित्र मंडळ, भंडारा यांचा २० वा वर्धापनदिन व १०५२ वा संगीतमय सुंदरकांड सोहळा संभाजी लॉन, भंडारा येथे भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यास ६५० हून अधिक रामभक्तांची उपस्थिती लाभली.

सन २००६ मध्ये सुरू झालेली मंडळाची ही भक्तिमय वाटचाल आज दोन दशकांच्या अखंड साधना, श्रद्धा आणि सेवाकार्याचा प्रेरणादायी टप्पा गाठत आहे. श्री अशोककुमार घेई यांच्या निवासस्थानी झालेल्या पहिल्या सुंदरकांड पाठाने या परंपरेचा प्रारंभ झाला. आजवर १०५२ संगीतमय सुंदरकांडचे आयोजन ही मंडळाच्या सातत्यपूर्ण कार्याची उल्लेखनीय उपलब्धी असून, सध्या मंडळात १८७ सदस्य कार्यरत आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना, गुरुवंदना, गणेश वंदना व सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर संगीतमय सुंदरकांड, हनुमान चालीसा, भजन, आरती व पुष्पांजलीने वातावरण भक्तिसाने भारावून गेले. मंडळाच्या वीस वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत संस्थापक सदस्य व ज्येष्ठ सदस्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी नवीन सदस्यांचे आत्मीय स्वागतही करण्यात आले.

धार्मिक उपक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जवण्यात मंडळने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रक्तदान शिबिरांना सहकार्य, नेत्रदान जनजागृती, श्रीराम मंदिर निर्माण कार्यास योगदान, गरजू विद्यार्थी व संस्थांना मदत तसेच नेपाळमधील नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मदतकार्य अशा विविध उपक्रमांत मंडळ सहभागी झाले आहे. देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांसाठी संगीतमय सुंदरकांडाचे आयोजन करणे हा मंडळाच्या कार्यातील विशेष उल्लेखनीय उपक्रम ठरला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ऑनलाइन प्रसारणाद्वारे अधिकाधिक रामभक्तांपर्यंत सुंदरकांड पोहोचविण्याचे कार्यही मंडळ करीत आहे. मंडळाच्या प्रणेतून नोएडा येथेही या भक्तिपरंपरेचा विस्तार होत आहे.

या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी संभाजी लॉनचे संचालक सूरज बंगडकर यांनी योगदान दिले. संगीतमय सुंदरकांड सादर करणारे आयोजन समितीचे सदस्य, सहकारी, सेवाभावी कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व रामभक्तांचे मंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले. मंडळाच्या दिवंगत सदस्यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यापुढेही रामभक्तची परंपरा अखंडितपणे सुरू ठेवणे, युवा पिढीमध्ये संस्कार व नैतिक मूल्यांची रुजवणूक करणे आणि समाजसवेचे कार्य अधिक व्यापक करणे, असा संकल्प मंडळाने व्यक्त केला. भक्ती, एकता आणि मानवसेवा यांचा सुंदर संगम असलेली श्रीराम मित्र मंडळाची वीस वर्षांची वाटचाल समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *