तुमसर येथे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता व जातीय सलोखा बैठक संपन्न
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- आगामी सण उत्सव तसेच राज्य महोत्सव श्री गणेश उत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने दि. ०३ सप्टेंबर २०२६ रोजी तुमसर पोलीस स्टेशन येथे तालुकास्तरीय शांतता व जातीय सलोखा बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीचे अध्यक्षस्थान पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी भूषविले. सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करतांना सर्व विभागांच्या प्रमुखानी आपापल्या विभागातील जबाबदारी निश्चित करून सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसंबंधाने काम करावे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. नूरूल हसन यांनी उपस्थित शांतता व जातीय सलोखा समितीचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, पत्रकार तसेच गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी यांना त्यांनी शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले.
या बैठकीस प्रामुख्याने उपविभागीय दंडाधिकारी अंजली भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी (अतिरिक्त कार्यभार) शिवम विसापुरे, तुमसरचे ठाणेदार सुभाष बारसे, तहसीलदारउपेश अंबाडे, न. प. मुख्याधिकारी करण चव्हाण, सहा. अभियंता प्रशांत महाजन, खंडविकास अधिकारी नंदकुमार वाडेकर, आगार प्रमुख सचिन आगरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नीतीन मिसुरकर वैद्यकीय अधिकारी, सहा. अभियंता एमएसईबी विभाग अमित पटले, तुमसर तसेच तुमसर उपविभागातील ठाणेदार नितीन राठोड पो. स्टे. आंधळगाव, विजय कसोधन पो. स्टे. सिहोरा, अभिजीत पाटील पो. स्टे. गोबरवाही, सपोनी किशोर घोडेस्वार, आकाशकुमार साखरे पो. स्टे. तुमसर हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्राचार्य राहुल डोंगरे यांनी केले तर आभारार गोबरवाहीचे ठाणेदार अभिजीत पाटील यांनी मानले. भंडारा जिल्हा पोलीस प्रशासन आगामी सण उत्सव विशेषतः राज्य महोत्सव श्री गणेश उत्सवा दरम्यान नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असून, कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
पोलिसा अधीक्षक नूरूल हसन यांनी केल्या महत्त्वाच्या सूचना
मा. पोलीस अधीक्षकानी आपल्या अध्यक्षीय भाषणात गणेश उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. डॉल्बी डीजे चा वापर करू नये, पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. वाहतुकीचे नियम पाळावे. अमली पदार्थांचे सेवन करू नये. अनधिकृत हालचालींवर विशेष लक्ष ठेवून काही आक्षेपार्ह आढळून आल्यास डायल ११२ मार्फत संपर्क साधावा. कोणतेही आक्षेपार्ह विधानने करू नये. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवा किंवा खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये व प्रसारित करू नये. जाती धर्मा मध्ये तेढ निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये.








