आज भगवान श्रीकृष्णाची होणार प्राणप्रतिष्ठा
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- भारतीय परंपरेनुसार श्रावण मासात येणारा सण म्हणजे श्रीकृष्णा जन्माष्टमी. याच दिवशी भगवान कृष्णाने दुष्ट राक्षसांचा नाश करण्यासाठी व सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी जन्म घेतला. हिंदू धर्मीयांमध्ये श्रीकृष्णा जन्माष्टमीचे सणाचे विशेष महत्व आहे. आज मोठ्या उत्साहात, भक्तिभावात भगवान कृष्णाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
भगवान कृष्णाला पंचपक्वानांनाचा भोग लावला जातो. भाविक भक्तांना सुद्धा पक्वानांचा, फराळांचा आस्वाद मिळतो. ठिकठिकाणी दहीहंडी फोड कार्यक्रम आयोजित केले जातात. श्रीकृष्णा जन्माष्टमीच्या निमित्ताने दिवसभर श्रीकृष्णाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्याची जागा स्वच्छ करून, घराघरात मंडप सजविले जाते. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही जल्लोष दिसून येतो. तरुणांमधील उत्साह तर वाखाणण्याजोगा असतो. लहान मुले तर मीच श्रीकृष्णाची मुर्ती घरी घेऊन जाणार म्हणूनही आई वडीलांकडे अद्घाहास धरतात. पूर्व विदर्भात जन्माष्टमी ‘कानोबा’ या नावाने साजरा केला जातो.
सायंकाळी घराघरांत भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीची स्थापना करू मनोभावे पूजा केली जाते. लाही, चने, घरात बनविले गेले गोड पदार्थ विशेषतः: करंजी, सुवारी, वडे, वेणी यांचे तोरण लावले जाते. आठ दिवसांपूर्वी गहू पेρούν तयार झालेली भुजली देवासमोर ठेवली जाते. सण, उत्सवाच्या निमित्ताने आमस्वकियांना, मित्रपरिवाराना जेवणाचे, फराळाचे निमंत्रण देवून भोजन दान करण्यात येतात. रात्री भजन, किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन होतात. रात्री १२ वाजता कृष्ण जन्माचे वेळी पुजापाठ करून, नारळ फोडून प्रसादाचे वितरण केले जाते. भगवान कृष्णाचा जयजयकार केला जातो. ‘हाथी घोडा पालखी, जय कन्हैया लाल की’ असा जयघोष घराघरांतून घुमताना दिसून येतो.








