तुमसर येथे ३ लाख ६४ हजारांची फसवणूक
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- ओव्हरड्राफ्ट लिमिट बनवून देण्याच्या बहाण्याने ३ लाख ६४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना तुमसर येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश परसराम भुरे (वय ५०, रा. नेहरू नगर, तुमसर) हे आहेत तर आरोपी आर्चिस गोविंद बडवाईक (वय २७, रा. श्रीराम नगर, तुमसर) हा आहे. आरोपीने तुमसर येथे फिर्यादीचा विश्वास संपादन करून एचडीएफसी बँकेतून २५ लाख रुपयाचे ओव्हरड्राफ्ट लिमिट बनवून देतो असे सांगितले. त्यासाठी आरोपी आर्चिस बडवाईक याने घराचे कागदपत्र व बँकेचे फॉर्मवर फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीची सह्या घेतल्या. त्यानंतर आरोपीने फिर्यादीकडून नगदी २ लाख २३ हजार ६६२ रुपये घेतले. तसेच फिर्यादीच्या नावाची जीमेल आयडी बनवून मोबाईल ॲप बनवून वेगवेगळ्या बँकेतून १ लाख ४१ हजार ०९७ रुपये कर्ज काढून उचल केली. अशा प्रकारे फिर्यादीची एकूण ३ लाख ६४ हजार ७५९ रुपयांची फसवणूक केली.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे अप. क्र. ४४४ / २०२६ कलम ३१८(४) भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.








