पोलिस व तरुणांचा भरधाव स्कॉर्पिओचा दोन तास थरारक पाठलाग
दै. लोकजन वृत्तसेवा
मोहाडी :- सुकळी येथून भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओचा पोलिसांनी सुमारे दोन तास पाठलाग करून डोंगरगाव येथे आरोपीला ताब्यात घेतले. या वाहनाच्या magaवर सुमारे ५० ते ६० दुचाकींवरून स्थानिक तरुणही गेले होते. डोंगरगावच्या हद्दीत स्कॉर्पिओने म्हशीला धडक दिल्याने वाहनाचा वेग कमी झाला. याच वेळी पोलिसांनी आणि तरुणांनी वाहन थांबवून आरोपीला ताब्यात घेतले.
सुकळी येथील राधेकृृष्ण ठवकर यांच्या वेल्डिंग दुकानासमोरून सकाळी दहाच्या सुमारास एमएच ४, एचएम ७६१३ क्रमांकाची स्कॉर्पिओ भरधाव वेगाने जात असल्याचे अमित चौधरी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत तुमसरचे पोलीस निरीक्षक सुभाष बोरसे यांना माहिती दिली. बोरसे यांनी तत्काळ मोहाडीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी स्कॉर्पिओचा पाठलाग सुरू केला. आंधळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन राठोड यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. मोहाडी पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल अशोक लांजेवार, त्रिमूर्ती लांडगे आणि वैभव काळे यांनीही वाहनाचा पाठलाग केला.
स्कॉर्पिओ सुकळी, मांडळ, पांजरा, परसवाडा, खरबी, मोहाडी, पारडी, चिंचखेडे, मांडेसरा आणि कान्हळगाव मार्गे डोंगरगावच्या दिशेने गेली. मांडेसरा येथे वाहन अडवण्यासाठी चौकात ट्रॅक्टर आडवा लावण्यात आला होता. मात्र, चालकाने वाहन रिव्हर्स घेऊन पुन्हा मोहाडीच्या दिशेने वाहन वळविले. त्यानंतर कान्हळगाव फाट्यावरून डोंगरगावकडे वाहन नेण्यात आले.
डोंगरगावच्या हद्दीत स्कॉर्पिओने एका म्हशीला धडक दिली. या अपघातात म्हैस गंभीर जखमी झाली. वाहनाचा वेग कमी झाल्याने पोलिसांनी आणि magaवर असलेल्या तरुणांनी आरोपीला पकडले. यावेळी झालेल्या मारहाणीत तसेच अपघातात आरोपी जखमी झाला. त्याला उपचारासाठी प्रथम मोहाडी येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात व नंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, स्कॉर्पिओ पोलिसांनी ताब्यात घेऊन आंधळगाव पोलीस ठाण्यात जमा केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहाडीचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे करीत आहेत.








