लाखनी-साकोलीला दुष्काळ यादीतून वगळणे म्हणजे राजकीय सूडबुद्धी – आ. नाना पटोले

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील लाखनी व साकोली तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्याने आ. नाना पटोले यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केला आहे. हा निर्णय शेतकऱ्यांवर राजकीय सूडबुद्धीने केलेला अन्याय असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र शासनाने १४ ऑक्टोबर २०२६ रोजी खरीप हंगाम २०२६ साठी ट्रिगर-१ व ट्रिगर-२ निकष लागू झालेल्या ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. यात भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, लाखांदूर, मोहाडी व तुमसर या पाच तालुक्यांचा समावेश करण्यात आला. तर लाखनी व साकोलीला वगळण्यात आले.

पटोले म्हणाले, ‘दुष्काळाचे निकष ठरवताना शेतकऱ्यांची परिस्थिती पाहायची की आमदार कोणत्या पक्षाचा आहे हे पाहायचे? शेतकऱ्यांचे नुकसान पक्ष पाहून होत नाही, मग मदत देताना राजकीय भेदभाव का?’ लाखनी व साकोली हे दोन्ही तालुके आपल्या कार्यक्षेत्रात येत असल्याने विरोधी आमदार असल्यामुळे वगळले का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

यंदा अनियमित पाऊस, पाण्याची टंचाई आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे धान पीक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अशा वेळी सवलतीपासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याचे ते म्हणाले. दुष्काळ वगळण्याचा निर्णय कोणत्या निकषांवर घेतला. प्रत्यक्ष पीक नुकसानाची मूल्यांकन कसे केले. याबाबत सरकारने पारदर्शकता दाखवावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘लाखनी-साकोलीतील शेतकऱ्यांच्या संभ्रमाचा अंत पाहू नका. दुष्काळाला राजकीय रंग देऊ नका. या अन्यायाविरोधात मी गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर उतरlasयास सरकार जबाबदार असेल,’ असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *