कारेमोरे यांच्या पाठपुराव्याने तुमसर-मोहाडीला दुष्काळी दिलासा

शेतकऱ्यांना विविध सवलतींचा मार्ग मोकळा

दै. लोकजन वृत्तसेवा

मोहाडी :- पावसाची दडी, धानिकांवर किडींचा हल्ला आणि हाताोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती; अशा दुहेरी संकटात सापडलेल्या तुमसर-मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. आमदार राजू कारेमोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे दोन्ही तालुक्यांचा दुष्काळाच्या ‘ट्रigger-२’ यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती व मदतीचा लाभ मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

एकيकडे तुमसर-मोहाडीतील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी साकोली आणि लाखनी तालुक्यांचा ‘ट्रिगर-२’च्या यादीत समावेश न झाल्याने तेथील शेतकऱ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात पावसाची कमतरता आणि धानपिकांच्या नुकसानीची परिस्थिती असताना दोन तालुक्यांना वगळण्यामागील निकष काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता शासनाच्या सवलती प्रत्यक्षात कधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. केवळ यादीत समावेश करून न थांबता पात्र शेतकऱ्यांना मदत वेळेत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पावसाने दगा दिला, किडींनी उरलेसुरले पीकही संकटात!

यंदा भंडारा जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने धानशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पाण्याचे नियोजन करून शेतकऱ्यांनी कसेबसे पीक जगविण्याचा प्रयत्न केला; मात्र मावा, तुडतुडा आणि गादमाशीच्या प्रादुर्भावाने त्यांच्या अडचणीत आणखी भर घातली. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. अशा परिस्थितीतही सुरुवातीला ‘ट्रिगर-१’ मध्ये तुमसर-मोहाडीचा समावेश झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती.

टीकेला कामातून उत्तर

दोनों तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत समावेश न झाल्याने आमदार राजू कारेमोरे यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मात्र, टीकेला उत्तर देण्यासाठी त्यांनी शासनदरबारी पाठपुरावा सुरू ठेवला. मुख्यमंत्री तसेच संबंधित यंत्रणांकडे वारंवार वस्तुस्थिती मांडून शेतकऱ्यांच्या संकटाकडे लक्ष वेधले. पालकमंत्र्यांसोबत विविध गावांतील शेतशिवारांना भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणीही केली. अखेर या प्रयत्नांना यश आले आणि तुमसर-मोहाडीचा ‘ट्रिगर-२’ मध्ये समावेश झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *