रब्बी हंगामात चांदपूर जलाशयाचे पाणी मिळेल का?
शेतकरी संभ्रमात; दुष्काळ परिस्थितीचा घोळ
दै. लोकजन वृत्तसेवा
सिहोरा :- दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांदपूर जलाशयाचे पाणी मिळेल की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करणाऱ्या चांदपूर जलाशयाचे पाणी येरली जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी राखीव आहे. पहिल्या टप्प्याचे पाणी चुल्हाड जिल्हा परिषद तर दुसऱ्या टप्प्याचे पाणी सिहोरा जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
रोटेशन पद्धतीने तिसरा टप्पा हा येरली जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी राखीव आहे. खरीप हंगामातील धान कापणीला सुरुवात झाली असून हलक्या धानाची कापणी काही प्रमाणात झालेली आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाच्या तयारीला लागावे की नाही या संभ्रमात अनेक शेतकरी दिसत आहेत. जर पाणी मिळत नसेल तर शेती पडीत ठेवण्यापेक्षा जवस, मोहरी, गहू किंवा हरभरा लावण्याच्या तयारीत दिसत आहेत. परंतु चांदपूर जलाशयाचे पाणी वेळेवरच सोडण्यात आले तर यात शेतकऱ्यांचा मोठा नुकसान होईल व वेळेवर रब्बी हंगामासाठी पाणी मिळाले नाही तरीही नुकसान होईल. हातचे गेले व मुठचेही गेले हाती आले धुपाटणे अशी गत शेतकऱ्यांची होईल.
रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करण्यासाठी व शेतकऱ्यांचे होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून या महत्वपूर्ण विषयावर तातडीने आपली महत्वपूर्ण भूमिका विशद करावी जेणे करून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. याकडे सुद्धा आ. राजूभाऊ कारेमोरे यांचे लक्ष वेधण्यात येत आहे.
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता चांदपूर जलाशयाचे पाणी जलाशयातच राखीव असेल याबाबत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून तुमसर/मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आ. राजूभाऊ कारेमोरे यांनी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता तात्काळ दखल घ्यावी व या प्रकरणात चांदपूर जलाशयाच्या अधिकाऱ्यां बरोबर समेट घडवून संभ्रमात असलेल्या शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
‘दुष्काळ सदृश्य परिस्थिती लक्षात घेता तलाव, बोड्या, विहीरी व जनावरांसाठी चांदपूर जलाशयाचे पाणी राखीव ठेवण्यात येईल. रब्बी हंगामासाठी चांदपूर जलाशयाचे पाणी सोडण्याचे सध्या नियोजन नाही. चांदपूर जलाशयात २८ ते ३० फूट पाणी असून खरीप पिकाला पुरवठा करणे सुरू आहे.’
– एस. बी. चिमणकर, कनिष्ठ अभियंता पाटबंधारे विभाग








