भंडारा जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित

लाखनी व साकोली वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- जिल्ह्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने भंडारा जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहेत. यापूर्वी भंडारा, पवनी व लाखांदूर या तीन तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले होते, तर आता तुमसर व मोहाडी या दोन तालुक्यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. मात्र लाखनी व साकोली हे दोन तालुके या यादीतून वगळण्यात आल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा ४० ते ५० टक्के कमी पाऊस झाला आहे. भंडारा, पवनी, लाखांदूर या तालुक्यात पेरणी उशिरा झाली, तर पेरलेले धान पीक पावसाअभावी करपून गेले. तलाव, बंधारे कोरडेठाफ पडले आहेत. जनावरांच्या ताऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या परिस्थितीचा आढावा घेऊन महसूल व कृषी विभागाने पैसेवारी व आणेवारी अहवाल शासनाला सादर केला होता. त्यानुसार शासनाने प्रथम तीन तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले.

त्यानंतर तुमसर व मोहाडी तालुक्यातही परिस्थिती गंभीर असल्याचे निदर्शनास आल्याने लोकप्रतिनिधी व शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर शासनाने या दोन्ही तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त यादीत समावेश केला आहे.

एकूणच पाच तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी दोन तालुके वगळल्याने जिल्ह्यात असंतोषाची ठिणगी पडली आहे.

दुष्काळग्रस्त घोषित झाल्याने मिळणारे लाभ

दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती मिळणार आहेत. यामध्ये पीक कर्ज वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात सूट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामांना प्राधान्य, टंचाई भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करणे, तसेच पीक विमा व अनुदानाचा लाभ तातडीने देणे या बाबींचा समावेश आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबतचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून लवकरच प्रत्यक्ष मदत वाटप सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.

दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रुपये

राज्यातील आणखी चाळीस तालुके दुष्काळी म्हणून जाहीर करतानाच, या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आगामी दिवाळीच्या तोंडावर दिलासा म्हणून त्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांचा अग्रीम जमा करण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *