लोखंडी गेट अंगावर पडून ६ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
पवनी:- खेळत असताना घराच्या परिसरातील लोखंडी गेट अंगावर पडल्याने डोक्याला गंभीर दुखापतहोऊन ६ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज घडली आहे. मृत चिमुकलीचे नाव शिवन्या विशाल पंचभाई (६), रा. भोजापूर असून, ही घटना आज १४ ऑक्टोबर रोजी दुपारी सुमारे २ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भोजापूर येथील शिवशंकर समृतवार यांच्या घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले असून, परिसराच्या भिंतीवर लोखंडी गेट बसविण्यात आले होते. दुपारच्या सुमारास ६ वर्षीय शिवन्या त्या गेटवर झोका घेत खेळत होती, त्याचवेळी अचानक अवजड गेट तिच्या अंगावर कोसळले. गेट थेट डोक्यावर पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली. कुटुμβियांनी तात्काळ तिला पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारदरम्यानच तिने प्राण सोडले. डॉक्टरांच्या अहवालानुसार, डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तिचा मृत्यू झाला.
मृत शिवन्या ही तिच्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी होती. गेल्याच महिन्यात सप्टेंबरमध्ये तिचा ५ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. वाढदिवसाचा आनंद ओसरत नाही तोच महिनाभरात या चिमुकलीवर काळाने घाला घातल्याने पंचभाई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण भोजापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.








