अचूक निदानासाठी गुणवत्ता पडताळणी
*मोहाडी ग्रामीण रुग्णालयात एसटीडीसी पथक दाखल
*अचूक व विश्वासार्ह निदान सेवांवर भर
दै. लोकजन वृत्तसेवा
मोहाडी :- राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण रुग्णालय, मोहाडी येथील प्रयोगशाळेची बाह्य गुणवत्ता मूल्यांकन तपासणी ९ ऑक्टोबर रोजी राज्य क्षयरोग नियंत्रण व प्रशिक्षण केंद्राच्या (एसटीडीसी) पथकाकडून करण्यात आली. या भेटीत प्रयोगशाळेतील तपासणी प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, नोंदींची देखभाल आणि जैवसुरक्षा उपाययोजनांची पाहणी करून निदान सेवांचा दर्जा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
क्षयरोगाचे अचूक निदान आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यासाठी प्रयोगशाळेची गुणवत्ता महत्त्वाची असते. याच पार्श्वभूमीवर एस.टी.डी.सी. पथकाने मोहाडी ग्रामीण रुग्णालयातील प्रयोगशाळेच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. तपासणीसंबंधित नोंदी, गुणवत्ता नियंत्रणाची कार्यपद्धती, उपलब्ध सुविधा आणि जैवसुरक्षेच्या नियमांचे पालन यांची पडताळणी करण्यात आली. तसेच गुणवत्ता आश्वासन प्रणाली अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
या पथकामध्ये डॉ. प्रमोद रेवाळे, दीलप्पा बामापाले, राहुल गुडापे आणि अमोल भुतेकर यांचा समावेश होता. ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. निशा भावसार यांच्यासह महेश मन्नाडे, पुरण मेंढे, कुशल जुनघरे आणि सुषमा बघमारे यावेळी उपस्थित होते.
विश्वासार्ह निदान सेवांना बळ क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टांसाठी निदान प्रक्रिया अचूकता, प्रयोगशाळेतील शिस्त आणि गुणवत्ता नियंत्रणाला विशेष महत्त्व आहे. बाह्य गुणवत्ता मूल्यांकनाच्या माध्यमातून प्रयोगशाळेतील कार्यपद्धतीचे परीक्षण करून आवश्यक सुधारणा करण्यास मदत होते. मोहाडी ग्रामीण रुग्णालयातील या तपासणीमुळे गुणवत्ता आश्वासन प्रणाली अधिक बळकट करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळणार असून, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत दर्जादार आणि विश्वासार्ह निदान सेवा उपलब्ध करून देण्यास मदत होईल.








