नगरपंचायत वाचनालयातून घडले १० ‘गुरुजी’

पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत लाखांदूरचा ठसा!

अभ्यासिकेतील नियमित परिश्रमाला यशाची सलामी

विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकपदी विद्यार्थ्यांची निवड

नरेश गजभिये

लाखांदूर (दै. लोकजन) :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी योग्य सुविधा, शांत अभ्यासाचे वातावरण आणि आवश्यक संदर्भसाहित्य उपलब्ध करून दिल्यास तेही यशाचे नवे शिखर गाठू शकतात, हे लाखांदूर नगरपंचायत वाचनालयातील विद्यार्थी सिद्ध करून दाखविले आहे. पवित्र पोर्टल शिक्षक भरती २०२५ मध्ये नगरपंचायत वाचनालयाच्या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून, आतापर्यंत १० विद्यार्थ्यांची विविध जिल्हा परिषदांमध्ये शिक्षकपदी निवड झाली आहे.

नगरपंचायत वाचनालय हे गेल्या काही काळापासून स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचे महत्त्वाचे केंद्र ठरत आहे. वाचनालयातील शांत व शिस्तबद्ध वातावरण, अभ्यासिका तसेच उपलब्ध शैक्षणिक साहित्यचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर उपयोग करून घेतला. सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर मेहनत आणि ध्येयाप्राती असलेली जिद्द यांच्या जोरावर या विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीमध्ये यश मिळवले.

विद्यार्थ्यांच्या यशामुळे नगरपंचायत वाचनालयाच्या शैक्षणिक उपक्रमाला नवी ओळख मिळाली असून, परिसरातील स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या यशाबद्दल नगरपंचायतीचे अध्यक्ष विनोद ठाकरे, उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख आणि मुख्याधिकारी पराग केणी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश इतर युवक-युवतींसाठी प्रेरणादायी असून, वाचनालयाच्या माध्यमातून भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी व्हावेत, यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.

‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक आणि मनात ध्येय असेल, तर यशाची वाट नक्कीच गाठता येते,’ हे या विद्यार्थ्यांच्या यशाने अधोरेखित केले आहे.

वाचनालय ठरत आहे ‘यशाचे केंद्र’
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचनालयातील अभ्यासिका म्हणजे केवळ अभ्यासाची जागा नसून स्वप्नांना दिशा देणारे व्यासपीठ होत आहे. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना कोणत्याही मोठ्या शहरात न जाता आपल्या परिसरात अभ्याससाठी सुविधा उपलब्ध झाल्याने त्यांना मोठा फायदा होत आहे.

या विद्यार्थ्यांची शिक्षकपदी निवड
१. रीना खुशाल वघारे, लाखांदूर, भंडारा जिल्हा परिषद

२. त्रिवेणी हरिजी लंजे, दांडेगाव, भंडारा जिल्हा परिषद

३. प्रतिभा मोदकराज रामटेके, लाखांदूर, पालघर जिल्हा परिषद

४. नेपाल तुलसीदास धोटे, डांभेविरली, गोंदिया जिल्हा परिषद

५. नितीन अशोक पारधी, लाखांदूर, रत्नागिरी जिल्हा परिषद

६. गंगा रामदासजी वैद्य, लाखांदूर, भंडारा जिल्हा परिषद

७. प्रणाली देवेंद्र डोंगरवार, मुरमाडी, भंडारा जिल्हा परिषद

८. ज्ञानेश्वर प्रेमचंद राऊत, मुंडीपार, बुलढाणा जिल्हा परिषद

९. आशिष रमेश गौरकर, लाखांदूर, रत्नागिरी जिल्हा परिषद

१०. कांचन ताराचंद पिलारे, परसोडी, चंद्रपूर जिल्हा परिषद

नगरपंचायत वाचनालयातून शिक्षकपदी निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, त्यांच्या याच्यामुळे लाखांदूरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरेपक्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *