झाडीबोलीतील चार ज्येष्ठ कवींवर आचार्य पदवी मिळविणे ही अभिमानाची बाब – डॉ. प्रीती कापगते
जांभळी येथे सहस्रचंद्रदर्शन सत्कार व गौरव सोहळ्यात प्रतिपादन
दै. लोकजन वृत्तसेवा
साकोली :- लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आयुष्यात खूप खस्ता खाल्ल्या. पण मनात जिद्द होती आणि आपण जीवनात स्वबळावर काहीतरी करून दाखवायचे हा निर्धार होता. अर्थात आयुष्याची वाट बिकट होती, पावलोपावली संघर्ष होता. हा सत्कार केवळ माझा गौरव नव्हता, तो माझ्या संर्षाचा सन्मान होता. आयुष्याच्या कित्येक वाटा अंधारातून चालले, कितीतरी स्वप्नांनी वेदनांचे ऊन-पाऊस सोसले; पण आज त्याच अंधाराच्या पलीकडे आशेचा एक सुंदर किरण दिसला. माझ्या मेहनतीला मिळालेली ही दाद मनाला नवी ऊर्जा देऊन गेली. या सुंदर क्षणासाठी ईश्वरापुढे मन:पूर्वक कृतज्ञ आहे आणि माझ्या प्रवासात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मनापासून आभार मानते. कालचा अंधार माझी परीक्षा होता, आजचा प्रकाश माझ्या संघर्षची साक्ष आहे. बोलीमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर, कवी हिरामान लांजे, अंजनाबाई खुणे आणि संत डोमाजी कापगते या झाडीबोली चळवळीतील चार वयोवृद्ध मातब्बर कवींच्या कवितावर आचार्य पदवी मिळवण्याचा पहिला मान मला मिळाला याचा मला निश्चितच अभिमान आहे असे प्रतिपादन डॉ. प्रीती कापगते यांनी जांभळी येथे केले.
नवयुवक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जासंवत पा. कापगते यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा व नुकتیच गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आचार्य पदवीने सन्मानित संस्थेच्या संचालिका प्रीती कापगते हातझाडे तसेच नवनियुक्त आ. अविनाश ब्राह्मणकर यांचा गौरव सोहळा दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी जांभळी सडक येथील मार्तंडराव पाटील कापगते विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात थाटात आयोजित करण्यात आला यावेळी सत्कारला उत्तर देताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते तर अतिथी म्हणून मातोश्री यशोदा कापगते, जि. प. सदस्य वनिता डोये, जयश्री देशमुख, माजी जि. प. सदस्य डॉ. विनोद नाकाडे, माहेश्वरी नेवारे, डॉ. प्रभाकरराव गहाणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रेम गहाणे, सभापती डॉ. उमाकांत काशिवार, जीवन शिक्षण संस्था लाखनीचे अध्यक्ष धनंजय तिरपुडे, श्याम शिक्षण संस्था खोडशिवनीचे अध्यक्ष शामराव मस्के, नवयुवक शिक्षण संस्थेचे सचिव तथा संयोजक होमराज कापगते आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जसवंत पा. कापगते यांच्या तर्फे नातू डॉ. दीपक कापगते यांनी सत्कारला उत्तर देताना जीवनात संघर्ष महत्त्वाचा आहे त्यातूनच जीवनात यशाचे शिखर गाठता येते असे प्रतिपादन केले. अध्यक्ष डॉ. हेमकृष्ण कापगते यांनी सत्कार मूर्तीना शुभेच्छा दिल्या व उपस्थित सर्वांना कुटुंबातील कोणाचाही मृत्यू झाल्यास मरणोत्तर नेत्रदानासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. आ. अविनाश ब्राह्मणकर यांनी देखील आपल्या उत्स्फूर्त भाषणातून प्रीतींच्या यशाचे कौतुक केले व जासंवत कापगते यांना शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविक प्राचार्य होमराज कापगते यांनी तर सूत्रसंचालन एल. बी. पारधीकर व शारदा कोलतेके यांनी केले. आभार प्रदर्शन संस्थेचे संचालक सुशिल कापगते यांनी केले. यशस्वीतेसाठी संस्थेचे सर्व संचालक, प्राचार्य अर्चना सार्वे, प्राचार्य रामकृष्णा लांजे तसेच मार्तंडराव कापगते विद्यालय जांभळी व रामाजी कापगते विद्यालय बोदरा येथील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.








