उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- जिल्ह्यात उद्योगसनेही वातावरण निर्माण करून औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्यासाठी उपलब्ध भूखंडांची माहिती घेऊन ते उद्योजकांना तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षेत उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खादी व ग्रामोद्योग विभागाचे अधिकारी तसेच उद्योजकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी डॉ. सामंत बोलत होते.

भंडारा जिल्ह्यात एकूण ७ औद्योगिक क्षेत्रे असून त्यामध्ये १५७ विकसित भूखंड आहेत. त्यापैकी १३७ भूखंडांचे वाटप झाले आहे. वाटप केलेल्या भूखंडापैकी १९ औद्योगिक घटक बंद असून ३४ भूखंडांची मुदत संपलेली आहे. सध्या २० भूखंड वाटपासाठी उपलब्ध आहेत. हे भूखंड उद्योजकांना प्राधान्याने उपलब्ध करून देऊन जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती द्यावी, असे निर्देश डॉ. सामंत यांनी दिले.

उद्योगवाढीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, भूखंडांची उपलब्धता, प्रलंबित प्रकरणे तसेच उद्योजकांच्या अडचणींचा बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध परवान्या व सुविधांची पूर्तता संबंधित विभागांनी समन्वयाने आणि विहित कालावधीत करावी, असेही डॉ. सामंत यांनी सांगितले.

बैठकीत पीएम विश्वकर्मा योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंत ८० हजार ६६ कारिगरांची नोंदणी झाली असून त्यापैकी १६ हजार २६६ कारिगरांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. तसेच २ हजार १६० लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अण्णा ठाकरे यांनी दिली.

यावेळी मधकेंद्र योजनेच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला. साकोली तालुक्यातील पिটেझरी या ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित होत असलेल्या गावातील कामांच्या प्रगतीची माहिती घेण्यात आली.

बैठकीस खासदार डॉ. प्रशांत पडोळे, आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हाधिकारी सावनकुमार, जिल्हा उद्योग केंद्राचे सहायक आयुक्त हेमंत बडर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक विवेक पोटे, बिक्रीकर विभागाच्या सहायक आयुक्त उज्ज्वला बनाईत, खादी व ग्रामोद्योग विभागाचे अधिकारी श्री. देवीपुत्र तसेच औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रधान सचिव, उद्योग पी. अंबलगम यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी ऑनलाइन पद्धतीने बैठकीस उपस्थित होते.

जिल्ह्यात उपलब्ध औद्योगिक भूखंडांचा प्रभावी वापर, उद्योजकांना आवश्यक सुविधा आणि विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी यामुळे भंडारा जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *