रानडुकरांच्या उपद्रवामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान

वाढीव नुकसानभरपाई व झटका मशीन देण्याची उपवनरक्षकांकडे मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा

तुमसर :- तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात जंगली रानडुकरांच्या धુमाकुळाने ऊस पिकाचे अतोनात नुकसान होत असून शेतकरी पुरता आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसानीच्या tulनेत शासनाकडून मिळणारी भरपाई अत्यंत तोकडी असल्याने नुकसानभरपाईच्या रकमेत वाढ करण्यात यावी, तसेच पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांना ‘झटका मशीन’ उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी तहसीलदार तुमसर मार्फत उपवनरक्षक, वन विभाग भंडारा यांना दिलेल्या निवेदनातून सामाजिक कार्यकर्ते ठाकचंद मुंगुस्मारे यांनी केली आहे.

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या परिश्रमाने व भांडवल लावून ऊस पिकाची लागवड केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रानडुकरांचे टोळीच्या टोळी रात्रीच्या वेळी शेतात शिरून उभ्या ऊसाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करत आहेत. यामुळे शेतीचा मूळ उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

शासनाकडून मिळणाऱ्या टुटपुंज्या मदतीमुळे शेतकऱ्यांचा रोष अधिकच वाढला असून प्रत्यक्ष नुकसान आणि शासकीय भरपाई यात मोठी तफावत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

रानडुकरांनी केलेल्या ऊस पिकाच्या नुकसानीचे वनविभागाने तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि सध्याच्या टुटपुंज्या दराऐवजी शेतकऱ्यांना वाढीव व योग्य आर्थिक मोबदला द्यावा. तसेच वन्यजीवांपासून पिकांचे तात्काळ रक्षण करण्यासाठी वन विभागाच्या शासकीय योजनांतून शेतकऱ्यांना प्राधान्याने ‘झटका मशीन’ (सोलर फेन्सिंग) उपलब्ध करून देण्यात याव्यात. आणि रानडुकरांचा उपद्रव जास्त असलेल्या नाकाडोंगरी परिसरातील शेतीची व गावाची विशेष पाहणी करून वन्यजीवांचा मानवी बस्ती व शेतातील वावर रोखण्यासाठी ठोस व कायमस्वरूपी योजना आखावी. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असून यावर सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा मागण्या मान्य करण्यासाठी शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची इशारा दिला आहे.

निवेदन देतेवेळी सामाजिक कार्यकर्ते ठाकचंद मुंगुस्मारे, नंदलाल गौपाले उपाध्यक्ष नाकाडोंगरी को-ऑपरेटिव्ह राईस मिल नाकाडोंगरी, अभिमन्यू ठाकरे, पांडुरंग गोपाले, कार्तिक देशमुख यांच्यासह नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील बहुसंख्य नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *