क्रांती दिनानिमित्त शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली
युवक बिरादरीच्यावतीने सार्वजनिक वाचनालयात ‘क्रांतीस्वर गीतगायन’ स्पर्धा
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- आज क्रांती दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम हुतात्मा स्मारक येथे मशाल प्रज्वलित करून शहीदांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली.
यानंतर सर्व मान्यवरांसह विद्यार्थी, युवक आणि नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीत हुतात्मा स्मारक (लालबहादूर शास्त्री चौक) ते महात्मा गांधी चौक या मार्गावर मशाल रॅली काढण्यात आली. महात्मा गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पूर्णकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करून रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष मधुरा मिलिंद मदनकर, उपाध्यक्ष चंद्रकला भोपे, ठाणेदार उल्हास भुसारी, भंडारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, उपमुख्याधिकारी आकाश सहारे, नगरसेवक, गणमान्य नागरिक, तसेच शालेय विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
यानंतर सार्वजनिक वाचनालयात युवक बिरादरी, असर फाउंडेशन व नगर परिषद भंडाराच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे १५७ वे वर्ष, क्रांती दिनाचे ८४ वे वर्ष, स्वातंत्र्य दिनाचे ७९ वे वर्ष तसेच भंडारा युवक बिरादरीच्या ३२ व्या वर्धापननिदानिमित्त ‘क्रांती स्वरघोष’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आ. डॉ. परिणय फुके यांची विशेष उपस्थिती होती.








