रेती माफियांची महसूल पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न

पाच ट्रॅक्टर चालकांविरुद्ध गुन्हा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रोहा येथील वैगंगा नदीपात्रात अवैध रेती उत्खनन करणाऱ्या पाच ट्रॅक्टर चालकांनी महसूल पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.

सविस्तर असे की, फिर्यादी जगदीश देवाजी कुंभारे, मंडळ अधिकारी, मोहाडी यांना रोहा येथील वैनगंगा नदीपात्रातून रेतीचे उत्खनन सुरू आहे. अशी माहिती मिळाली. माहिती मिळताच मंडळ अधिकारी व महसूल पथकातील कर्मचारी घटनास्थलॉ पोहोचले. पाहणी केली असता वैनगंगा नदीपात्रात रोहा पुलाजवळ ५ ट्रॅक्टर व ट्रॉली रेतीने भरलेल्या दिसून आल्या. महसूल पथक घटनास्थलॉ आल्याचे लक्षात येताच ट्रॅक्टर चालकांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीमधील रेती नदीपात्रात फेकून देऊन ट्रॅक्टरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. महसूल पथकाने शासकीय वाहन अडवे करून त्यांना थांबण्याचा प्रयत्न केला असता निळ्या रंगाच्या स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरवरील चालकाने, ज्याने लाल रंगाचे जॅकेट परिधान केले होते व डोक्याला रुमाल बांधला होता, त्याने अत्यंत बेदरकारपणे जाणूनबुजून ट्रॅक्टर पथकाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. या कृतीमुळे उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला. ट्रॅक्टरच्या धडकेमुळे गंभीर दुखापत अथवा जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याच वेळी उर्वरित चार ट्रॅक्टर चालकांनी येळणे यांच्या वांग्याच्या शेतीतून ट्रॅक्टर पळवून नेले.

पळून गेलेल्या पाच ट्रॅक्टरचे वर्णन असे आहे. – १) विनाक्रमांकाचा एक ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली, स्वराज कंपनीचा, त्याला छत / टप नाही. २) उर्वरित चार ट्रॅक्टर निळ्या रंगाचे असून त्यांना निळ्या रंगाच्या ट्रॉली जोडलेल्या आहेत. या चारही ट्रॅक्टरना छत / टप आहे. सर्व ट्रॅक्टर व ट्रॉली विनाक्रमांकाच्या आहेत. सदर पाचही ट्रॅक्टर वैनगंगा नदीपात्रातून रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीसाठी वापरले जात असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः नदीपात्रातील पुलाखालील भागातून उत्खनन केल्यास पुलाच्या पायाभूत संरचनेवर व स्थैर्यावर विपरीत परिणाम होऊन भविष्यात पुलाच्या सुरक्षितेस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. घटनेनंतर प्राथमिक चौकशीत संबंधित वाहनांचे मालक व चालक यांची माहिती मिळाली असून घटनास्थलॉ असलेल्या दोन ट्रॅक्टर चालकांचे मोबाईल फोनद्वारे फोटो घेण्यात आले आहेत. यामध्ये हंसराज राऊत, रा. सुकळी याचा ट्रॅक्टर असल्याचे माहिती मिळाली आहे. फिर्यादीच्या लेखी रिपोर्टवरून पो स्टे मोहाडी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये एकूण ५ ब्रास रेती, किंमत ३० हजार रुपये चा माल अंतर्भूत आहे. पुढील तपास पोहवा नागोराव गायधने हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *