रात्रगस्तीतील सतर्कतेने तीन घरफोडे जेरबंद; देवरी पोलिसांची धडाकेबाज कारवाई!
दै. लोकजन वृत्तसेवा
देवरी :- शहरातील बंद घरे हेरून घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना देवरी पोलिसांनी रात्रगस्तीदरम्यान पाठलाग करून जेरबंद केले. त्रिमूर्तीनगर परिसरात एका बंद घराचे कुलूप तोड़ून सोन्या-चांदीचे सुमारे ४५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्यानंतर आरोपी अन्य एका घरात चोरी करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, रात्रगस्तीवरील पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा डाव उधळला गेला. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे संभाव्य दुसरी घरफोडीही टळली आहे.
ही घटना ३ नोव्हेंबरच्या रात्री घडली. त्रिमूर्तीनगर येथील भारती नितीन शिरपुरकर (वय ४६) या कुटुंबासह बाहेरगावी एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधत बंटी विनोद धुर्वे (वय १८), अनिकेत कैलास कासोदे (वय २७) आणि अंकुश रामसिंग कवडे (वय २७), तिघेही रा. वरूड, जिल्हा अमरावती यांनी घराच्या दरवाजाची कुंडी तोडून आत प्रवेश केला. बेडरूममध्ये ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने घेऊन त्यांनी घटनास्थल from पळ काढला.
यानांतर याच परिसरातील दुसऱ्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न करून आरोपी पसार होत असताना रात्रगस्तीवरील देवरी पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी तातडीने त्यांचा पाठलाग केला आणि तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालाबाबत पुढील तपास सुरू आहे. ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी.
या प्रकरणी देवरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३१ (४), ३०५ (अ), ६२ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








