भंडारा जिल्ह्यात जादूटोण्यातून खुनाच्या वाढत्या घटना
मअंनिस्च्यावतीने कायद्याच्या जनजागृतीची मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा:- भंडारा जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यात जादूटोणा करनी केल्याच्या आरोपावरून दोन खून व मारहाणीच्या घटना घडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन जादूटोणा विरोधी कायद्याच्या प्रचार प्रसाराची मोहिम राबवावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती भंडाऱ्याच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यावतीने मुख्यमंत्र्याकडे करण्यात आली आहे.
गोबरवाही स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सीतासावंगी येथे एप्रिल २०२६ ला जादूटोणा करनी केल्याच्या आरोपावरून खून करण्यात आला. नुकतेच लाखंदूर पोलीस स्टेशन अंतर्गत मासळ येथे जादूटोणा करनी केल्याच्या कारणावरून खुनाचे प्रकरण घडले. या तीन महिन्यात दोन व्यक्तीचे खून झाले आहेत. भंडारा जिल्ह्यात अंधश्रद्धेमुळे अनेकदा ठिकाणी मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत.
महाराष्ट्र राज्यात जादूटोणाविरोधी कायदा २०१३ मध्ये अस्तित्वात आलेला आहे. या कायद्याची योग्य ती अमलबजावणी, प्रसार व प्रसार भंडारा जिल्ह्यात होत नसल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यात जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अमलबजावणीसाठी जनजागृती मोहिम सुरु करण्यात यावी. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये या कायद्यान्वये विशेष कक्ष तयार करण्यात यावा. जादूटोणा करनीमुळे होणाऱ्या भांडणामागील मुख्य सूत्रधार असलेल्या ढोंगी बाबाचा, दलालाचा शोध घेऊन त्यावर योग्य ती कारवाई करावी. याबाबतचे निवेदन बुवाबाजी संघर्ष विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे, चंद्रशेखर भivgade, पुरुषोत्तम गायधने, नितेश बोरकर, सुषमा बनसोड, कविता लोणारे यांनी जिल्हाधिकारी सावन कुमार भंडारा यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे.








