‘जय सेवा, जय गोंडवाना’च्या घोषणांनी गोंदिया दणाणले
जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य एकता रॅली
पारंपरिक कला-संस्कृतीचे सादरीकरण, शिक्षण-आरोग्य व वनहक्कांच्या प्रश्नांवरही आवाज
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- आदिवासी अस्मिता, संस्कृती आणि हक्कांचा बुलंद आवाज रविवारी ९ ऑगस्ट गोंदिया शहरात घुमला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी पीपल्स फेडरेशन आणि जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आदिवासी एकता रॅली व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. पारंपरिक वेशभूषा, मांदराचा निनाद, धनुष्य-बाण आणि विविध आदिवासी कलापथकांच्या सादरीकरणामुळे शहराला आदिवासी संस्कृतीचे अनोखे रूप पाहायला मिळाले.
आंबेडकर समाज भवन, मरातटोली येथून सकाळी भव्य रॅलीस सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेतील हजारो आदिवासी बांधव रॅलीत सहभागी झाले होते. ‘जय सेवा, जय गोंडवाना’, ‘आदिवासी एकता जिंदाबाद’ अशा घोषणांनी शहर दुमदुम गेले. रॅलीत पारंपरिक वाद्ये आणि आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे विविध देखावे लक्षवेधी ठरले.
रॅलीनंतर आयोजित सांस्कृतिक महोत्सवात मांदर वादन आणि रेला नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्ह्यातील विविध गावांतील कलापथकांनी गोंड, कोलाम, माडिया आणि पारधी समाजाच्या पारंपरिक गीत, नृत्य व झांकी सादर करून उपस्थांची दाद मिळवली. आदिवासी वेशभूषा स्पर्धेलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्मक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुरम होते. खासदार डॉ. एन. डी. किसान यांच्या हस्ते उद्घाटन, तर आमदार विनोद अग्रवाल यांच्या सहउद्घाटनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. खासदार राजेंद्र जैन यांचा सत्कार करण्यात आला. नगराध्यक्ष सचिन शेंडे, फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष करण टेकाम, प्रीतमसिंग कोडापे, विभागीय वन अधिकारी दुर्गाप्रसाद कोकोडे, अनिल वट्टी, अजय कोठेवार, जगदीश मडावी, ॲड. विवेक धुर्वे, प्रा. नीलकंठ चिचाम आदी उपस्थित होते.
सांस्कृतिक उत्सवाबरोबरच प्रश्नांवरही भर देण्यात आला. आदिवासी समाजाच्या शिक्षण, आरोग्य, जमीन आणि वनहक्कांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या मागण्यांसंदर्भातील निवेदन राज्यपाल आणि आदिवासी विकास मंत्र्यांना तहसीलदारामार्फत देण्यात आले.
कार्यक्रमचे सूत्रसंचालन मीनाक्षी वट्टी यांनी केले. संगीता पुसाम व ललिता ताराम यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांसाठी अल्पोपहार व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने संस्कृतीचे जतन आणि हक्कांसाठी संघटित संघर्षचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.








