खा.राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; एन.एम.डी.कॉलेजमध्ये नागरिक,पदधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी
खासदार म्हणून पहिल्याच वाढदिवशी समर्थकांमध्ये उत्साह
दै. लोकजन वृत्तसेवा
गोदिया :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त गोंदिया शहरातील एन.एम.डी. कॉलेजच्या ऑडिटोरियम हॉलमध्ये शुभेच्छा देण्यासाठी नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली. दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यावरांची उपस्थिती आणि शुभेच्छांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
राजकीय व सामाजिक क्षेत्रात प्रदीर्घ काळापासून सक्रिय असलेल्या राजेंद्र जैन यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांचे निक्रवर्ती म्हणून राजकीय वर्तुळात ओळख आहे. नुकतीच राज्यसभेवर निवड झाल्यानंतर खासदार म्हणून जबाबदारी स्वीकारलेल्या जैन यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने समर्थकांसाठी या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येनें एन. एम. डी. कॉलेजमध्ये दाखल झाले. पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देतानाच उपस्थितांनी जैन यांच्या निरोगी, दीर्घायुषी आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठीही त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राजेंद्र जैन यांनी उपस्थितांशी संवाद साधत मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनतेने व्यक्त केलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांनी दिलेले प्रेम हीच आपली मोठी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. खासदार म्हणून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त झालेली गर्दी ही केवळ शुभेच्छा कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता त्यांच्या राजकीय प्रभावाची आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या संपर्काची झलक देणारी ठरली. राज्यसभेतील नव्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर समर्थकांचा हा उत्साह आगामी काळातील त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचा मानला जात आहे.








