चिमुकलीवर अत्याचार प्रकरणी सर्वत्र संताप, कठोर शिक्षेची मागणी
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी आंबेडकर वार्ड, भंडारा येथे दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी रोहित संजय वासनिक (वय ३०, रा. गौतम बुद्ध समता नगर, भंडारा) याने तीन वर्षीय निष्पाप चिमुकलीवरील अत्याचार केला. या घटनेने शहरात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त करण्यात आला. आज भंडारा शहरात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. तसेच सर्वच पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना आरोपीला कडक शिक्षा देण्यासाठी निवेदन देण्यात आले.
सदर प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने व निष्पक्षपणे पूर्ण करण्यात यावा. या खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात करण्यात यावा. कायद्यानुसार आरोपीविरुद्ध सर्वाधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच पीडित चिमुकली व तिच्या कुटुंबाला तातडीने न्याय, आवश्यक वैद्यकीय उपचार व शासकीय मदत उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
विशेष म्हणजे या मोर्यात शाळकरी मुलींचाही सहभाग होता. गांधी चौकातून मोर्चा काढल्यानंतर त्रिमूर्ती चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रभारी पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी स्वतः मोर्चास्थळी येऊन त्यांचे निवेदन स्वीकारले. व घटेनेतील आरोपीला कडक शिक्षा करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कार्याची माहिती दिली.








