भूमिगत खाणीत स्लॅब कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी लक्ष हॉस्पिटल भंडारा येथे भेट देवून जखमीची विचारपूस केली. चिखला मोइल वर्टीकल दोन अंडरग्राऊंड लेव्हल ३ मध्ये १०० मीटर खोली असलेल्या ठिकाणी पहिल्या शिफ्टचे कामगार काम करीत होते. साधारण सकाळी ९.०० ते ९.३० वाजताच्या खाणीत मॅग्नीज काढण्याचं काम सुरू होते. दरम्यान स्लॅब कोसळून ढिगाऱ्याखाली तीन कायमस्वरुपी कामगार दबले गेल्याने त्यातील दोन कामगार जागीच मृत पावले. चिखला मॉइल्सची २४२५ नंबरच्या फेसमध्ये ही दुर्घटना घडली. मॅगनीज ब्लास्टिंर्गनंतर त्यातील मॅग्नीज काढण्यासाठी सकाळी सहा ते सात कामगार अंडरग्राऊंडमध्ये कामासाठी गेले होते.
एका कामगारास उपचारासाठी भंडारा येथील लक्ष हॉस्पिल भंडारा येथे भरती करण्यात आले आहे.दोन्ही कामगारांचा मृत्यूदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.घटनेची माहिती होताच तुमसरचे तहसीलदार मोहन टिकले, नायब तहसीलदार संजय जांभूळकर, तलाठी मनोज वरखडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तर जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी जखमीची रुग्णालयात भेट घेतली. अपघाताची माहिती होताच परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. मोबाईलवर प्रशासनाचे विरोधात रोषही व्यक्त करतांना दिसत होते.