रावणवाडीच्या जंगलात आढळला दुर्मिळ विषारी ‘बांबू पिट व्हायपर’

दुर्मिळ प्रजातीचा बेडूकही सापडला; जिल्ह्याच्या जैवविविधतेत ऐतिहासिक भर
दै. लोकजन वृत्तसेवा

लाखनी : भंडारा जिल्ह्याच्या जैवविविधतेसाठी अभिमानास्पद आणि संशोधकांसाठी थरारक ठरलेली घटना रावणवाडी परिसरात घडली आहे.

येथील जंगलात अत्यंत दुर्मिळ आणि जहाल विषारी मानला जाणारा बांबू पिट व्हायपर अर्थात हिरवा चापडा साप जीवंत अवस्थेत आढळला आहे. यासोबतच टर्माईट हिल फ्रॉग आणि पेंटेड बलून फ्रॉग या दोन दुर्मिळ बेडूक प्रजातीही आढळल्याने विदर्भाच्या हर्पेटोफॉना अभ्यासात नवा अध्याय जोडला गेला आहे. हा शोध ग्रीन नेचर फाउंडेशन अर्थात ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लब, लाखनी व अड्याळ यांच्या नेतृत्वात झालेल्या विशेष जैवविविधता सर्वेक्षण मोहिमेत लागला.

गेल्या २२ वर्षांपासून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात साप, पाल, सरडे, बेडूक आणि पक्षांच्या दुर्मिळ प्रजाती शोधण्याचे काम ही संस्था करीत आहे. या मोहिमेत लाखनीचे सरीसृप संशोधक विवेक बावनकुळे, दर्वेश दिघोरे (पोहरा), आशिक नैतामे (अड्याळ), भंडाराचे रजत घुगुसकर, नागपूरचे निसर्ग संशोधक सागर व्होरा, ओडिशाचे मत्स्य संशोधक हितेश नाईक, भूशास्त्र अभ्यासक तुषारकांत राणा, तामिळनाडूचे मत्स्य संशोधक साथारिया प्रभाकरन आणि उमरेडचे सर्पमित्र जयेश भुसारी सहभागी झाले होते. सायंकाळच्या सुमारास रावणवाडीच्या रोडलगत सर्व्हे सुरू असताना एका झुडपाच्या फांदीवर पोपटा-हिरव्या रंगाची हालचाल दिसली. अनुभवी संशोधकांनी क्षणात ओळखले की हा बांबू पिट व्हायपर आहे.

यापूर्वी भंडारा जिल्ह्यात अड्याळचे सर्पमित्र रोशन नैतामे यांना हा साप मेलेल्या अवस्थेत सापडला होता, तर विदर्भात फक्त वर्धा जिल्ह्यात एकदा जीवंत नोंद आहे. त्यामुळे भंडारात जीवंत सापडणे ही मोठी घटना मानली जात आहे. याच रात्रीच्या सर्व्हेत ब्रॉंझ बॅक ट्री स्नेक (डोंगरबेल्ल्या), चेकर्ड किलबॅक (पाणदिवड), एक विंचू, एक सािंदर आणि काही दुर्मिळ माशांच्या प्रजातीही नोंदवण्यात आल्या.

या ऐतिहासिक शोधाबद्दल पंकज भिवगडे, मयूर गायधने, सलाम बेग, नितीन निर्वाण, गगन पाल, खेमराज हुमे, धनंजय कापगते, अशोक वैद्य, भैयाजी बावनकुळे, अशोक नंदेश्वर आदींनी संपूर्ण चमूचे अभिनंदन केले असून लवकरच यावर आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नलमध्ये शोधनिबंध प्रकाशित केला जाणार आहे.

“आठ वर्षांपूर्वी जिल्ह्यात कधीही न आढळणारा सॉ-स्केल्ड व्हायपर (फुरसे) चा शोध आमच्या चमूने लावला होता. या हिरव्या चापड्याचे शास्त्रीय नाव Trimeresurus stejnegeri असून हा हिमोटॉक्सिक विषाचा साप आहे. डंशाामुळे मांस काळे-नीळे पडून सडण्याची प्रक्रिया सुरू होते. पानासारख्या रंगामुळे तो बांबूच्या बेटात सहज मिसळतो. त्याचा मुख्य अधिवास पश्चिम घाट असून विदर्भात तो अत्यंत तुळक आहे.”

— प्रा. अशोक गायधने, कार्यवाही, ग्रीन नेचर फाउंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *