भंडारातून ३ ऑगस्टला फुंकले जाणार ‘मंडल यात्रे’चे रणशिंग

पत्रकार परिषद : विदर्भातील ११ जिल्ह्यांत ओबीसी जनगणनेसाठी होणार जनजागृती
भंडारा : जातीनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, तसेच ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी ‘सकल ओबीसी महामोर्चा’च्या वतीने विशेष आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून ३ ऑगस्ट ते ९ ऑगस्टदरम्यान विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांमध्ये ‘६ वी मंडल जनगणना यात्रा’ काढण्यात येणार आहे. ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून या यात्रेचा शुभारंभ ३ ऑगस्ट रोजी भंडारातील त्रिमूर्ती चौकातून होणार असल्याचे माहिती १ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

जातीनिहाय जनगणना न झाल्यामुळे ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी समाजाला दरवर्षी सुमारे १५ हजार कोटी रुपयांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारने अनुसूचित जाती-जमातीप्रमाणे ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम देऊन तातडीने जातीनिहाय जनगणना करावी, केंद्रात ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापना करावे, तसेच सरकारी सेवांमधील सुमारे १ लाख पदांचा बॅकलॉग तात्काळ भरावा, अशा ठळक मागण्या मांडण्यात आल्या.

… तर देशभार तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
शासनाने ओबीसींच्या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास आगामी काळात संपूर्ण देशभार तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ओबीसी संघर्ष समिती व सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने देण्यात आला.

विशेष तरतुदींची अपेक्षा
‘महाज्योती’ या संस्थेला १००० कोटी रुपयांचा भरीव निधी देणे, ओबीसी विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासक्रमांसाठी १०० टक्के शिष्यवृत्ती उपलब्ध करून देणे, प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र वसतिगृहे उभारणे, घरकुल योजनेची मदत ५ लाख रुपयांपर्यंत वाढविणे, ‘इतर मागास आर्थिक विकास महामंडळाला’ १००० कोटी रुपयांचा निधी देणे तसंच ५०० विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्ती देणे, अशा मागण्यांचा समावेश आहे.

तरुणांना सहभागाचे आवाहन
या जनजागरण यात्रेत विदर्भातील ओबीसी, व्हीजेएनटी व एसबीसी समाजातील बांधव, विद्यार्थी, महिला व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला यांची होती उपस्थिती
पत्रकार परिषदेला उमेश कोरम, ओबीसी संघर्ष समितीचे मुख्य संयोजक सदानंद इलमे, डॉ. बाळकृष्ण सर्वे, रोशन उरकुडे, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष गोपाल सेलोकर, संविधान संघर्ष समितीचे चंद्रशेखर टेंभुर्णे, रमेश शहारे, विष्णुदास जगनाडे, पंजाबराव कारमोरे, राजेश मडाμε, रोशन जांभूलकर, इंजि. रुपचंद रामटेके, सुधाकर मोथलकर, राजकुमार लांजेवार, श्रीकृष्ण पडोळे, अजाबाराव चिचाने, उमेश सिंगनजुडे, संविधान बचाव संघर्ष समितीचे ग्यानचंद जांभूलकर, दिलीप चोपकर, मुकुंदा पाचे, श्रीराम बोरकर, कमलेश सर्वे, परमेश्वर बलके, रंजित कोल्हटकर, असित बागडे, विलास केजरकर यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *