‘आदिशक्ती अभियानात ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी भंडारा जिल्ह्यात प्रथम’

दै. लोकजन वृत्तसेवा
साकोली:- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी ‘आदिशक्ती अभियान २०२५-२६’ अंतर्गत घोषित करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी ने उत्कृष्ट कामगिरी बजावत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

महाराष्ट्र शासनाने दि. ३१ जुलै २०२६ रोजी निर्गमित केलेल्या अधिकृत शासन निर्णयानुसार (क्रमांक: आदिपु-२०२५/प्र.क्र.१५ (ई-१६३८०८)/का-१०) हा बहुमान अधिकृतपणे घोषित करण्यात आला आहे.

राज्यातील महिला व बालकांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधणे तसेच महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविणे, या हेतूने राज्य शासनाने सन २०२५-२६ पासून ‘आदिशक्ती अभियान’ सुरू केले आहे. हे अभियान उत्कृष्टपणे राबविणाऱ्या ग्रामपंचायतींना राज्य, जिल्हा व तालुका स्तरावर ‘आदिशक्ती पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येत आहे.

भंडारा जिल्हास्तरीय पुरस्कार निकालात प्रथम क्रमांक ग्रामपंचायत खैरी/वलमाझरी (तालुका साकोली), द्वितीय क्रमांक ग्रामपंचायत रावनवाडी (तालुका भंडारा) व तृतीय क्रमांक ग्रामपंचायत पिंपळगाव कोहोळी (तालुका लाखांदूर) ठरले.

ग्रामपंचायत खैरी/वलमाझरीने गावात महिलांच्या आरोग्य सुधारण्यासाठी वैद्यकीय शिबिरे, किशोरी मुलींचे सबलीकरण, कुपोषण निर्मूलन उपक्रम आणि महिला बचत गटांना स्वावलंबी बनवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

या यशாமगे उमेश नंदगवली (उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत), पुंडलिक जाधव (गट विकास अधिकारी), आणि मनीषा परसमोडे (महिला व बालविकास अधिकारी) यांचे मोलाचे प्रशासकीय मार्गदर्शन लाभले. तसेच, ग्रामपंचायतीचे प्रशासक पुरुषोत्तम रुखमोडे व ग्रामपंचायत अधिकारी नरेश शिवणकर यांच्या नेतृत्वात आणि प्रभावी नियोजनात ही उल्लेखनीय कामगिरी साध्य झाली आहे.

सर्वत्र कौतुकाचा वर्षाव
ग्रामपंचायतीच्या या ऐतिहासिक यशात मोलाचे योगदान देणारे प्रशासक, ग्रामपंचायत अधिकारी, सर्व प्रशासकीय सदस्य, सर्व शिक्षक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका आणि खैरी/वलमाझरी गावातील ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

शासन निर्णयानुसार पुरस्कारार्थी ग्रामपंचायतींना सन्मानित करण्यासाठीचा विशेष गौरव सोहळा लवकरच आयोजित केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *