भंडारा जिल्ह्यात एकाच दिवशी पोक्सो अंतर्गत दोन गुन्हे दाखल
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- शेजार धर्माला काळमिा फासणारी संतापजनक घटना काल रात्री शहरातील एका सोसायटीत घडली. एका वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या एका ११ वर्षीय मुलीला खोटे बोलून घरात घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी नराधमाला तासाभरातच बेड्या ठोकल्यात. विजय रेहपाडे असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून तो व्यवसायाने वकील आहे. पीडितेच्या आईंच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आई आणि १३ वर्षीय भावासोबत राहते. पीडित मुलीचे वडील शासकीय नोकरीत असून ते नोकरीनिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहतात.
पीडिता आणि आरोपी विजय रेहपाडे याची मुलगी समवयस्क असल्याने दोघींमध्ये मैत्री झाली. मागील काही महिन्यांपासून दोघींचे एकमेकींच्या घरी येणेजाणे आहे. दोघीही सोसायटीचे परीसरात सोबत खेळत असतात. घटनेच्या दिवशी दिनांक ३ मार्च रोजी पीडिता रोजच्याप्रमाणे सायंकाळच्या सुमारास सोसायटी परिसरात खेळण्याकरीता गेली. मात्र अर्धा तासातच ती घरी रडत रडत परत आली. त्यावेळी आईने “ती का रडत आहे?’ असे विचारले. मात्र तिचे रडणे थांबत नसल्याने आईने तिला बेडरुममध्ये नेले आणि रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलीने आईला आपबिती सांगितली.
पीडित मुलीने आईला सांगितले की, ती खेळण्याकरीता सोसायटी परिसरात गेली मात्र तिथे तिला तिची मैत्रीण दिसली नाही. त्यामुळे ती तिच्या मैत्रिणीला बोलाविण्याकरीता घरी गेली. त्यावेळी फ्लॅटचे दार मैत्रिणीचे वडील आरोपी विजय रेहपाडे याने उघडले. पीडीतेने तिची मैत्रीण घरी आहे का? अशी विचारणा केली असता आरोपी विजय रेडपाडे याने घरात खेळत आहे असे खोटे बोलून पीडित मुलीला घरात घेतले आणि बेडरुममध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत विजय रेडपाडे या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. तिने त्याला प्रतिरोध केला मात्र वासनांध नराधमाने तिला सोडले नाही. अखेर तिने त्याच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर ती रडत रडत घरी आली आणि आईला रेहपाडे याने केलेल्या दुष्कृत्याचे कथन केले. आईने ताबडतोब पोलीस ठाणे गाठले आणि विजय रेहपाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून वकिली पेशाला काळमिा फासणाऱ्या या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.
विवाहित असूनही अल्पवयीन मुलीचा विनयभंग
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मागील सहा महिन्यांपासून एका १६ वर्षीय मुलीचा विविध ठिकाणी विनयभंग करणाऱ्या २८ वर्षीय विवाहित तरुणाविरोधात जवाहर नगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सतिष सुरेश कानझोडे, २८ वर्ष, रा. भोसलेनगर परसोडी असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी ही परसोडी येथील एका विद्यालयात इयत्ता ११ वीत शिकत आहे. पीडितेचे वडील शिवणकाम करीत असून भंडारा येथील एका दुकानात ते कपडे शिवण्याचे काम करतात तर आई घरकाम करते. पीडितेच्या घराजवळ आरोपी सतिष सुरेश कानझोडे याचे घर आहे. सुरेश हा विवाहित असून त्याला दीड वर्षाची मुलगी सुध्दा आहे.
आरोपी सतिष कानझोडे आणि पीडितेच्या कुटुंबीयांचे घरघुती संबंध असल्याने पीडित मुलीचे आरोपीच्या घरी येणे जाणे असायचे. आरोपी सुध्दा पीडितेच्या घरी नेहमी येत जात असे. ऑगस्ट २०२४ मध्ये पीडित मुलगी घरी आलेली होती. त्यावेळी आरोपीची पत्नी आणि वडील घरीच होते. मात्र त्यांची नजर चुकवत त्याने पीडितेच्या विनयभंग केला. त्यानंतर प्रत्येकवेळी पीडिता घरी आली की आरोपी तिचा विनयभंग करीत असे. डिसेंबर २०२४ मध्ये सतिष कानझोडे याची मुलगी भंडारा येथील खाजगी रुग्णालयात भरती असताना दवाखान्यात त्याचे ये-जा सुरू होते. दरम्यान एक दिवस पीडित मुलीला तिच्या वैयक्तिक कामानिमित्त भंडाऱ्याला जायचे होते. त्यावेळी आरोपीने स्वतःच्या दुचाकीने तिला भंडाऱ्याला आणून काम झाल्यानंतर सूनसान जागी नेऊन तिचा विनयभंग केला.
आठ ते दहा दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास आरोपी पीडितेच्या घराच्या मागे येऊन तिला आवाज देऊ लागला. आवाज ऐकून पीडिता मागे गेली असता त्याने अंधारात पुन्हा तिची छेड काढली. त्याच रात्री पत्नीसोबत भांडण झाले असे सांगून तो पीडित मुलीच्या घरी तिच्या वडिलांसोबत रात्रभर झोपला. भीतीपोटी पीडितेने कुणाला काही सांगितले नाही. अखेर ४ दिवसांपूर्वी पीडितेने वरठी येथे राहणाऱ्या तिच्या मोठ्या आईजवळ इतक्या महिन्यात तिच्यासोबत घडलेले सर्व प्रकार सांगितले. मोठ्या आईने तिला पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने चाईल्ड हेल्प लाईनला फोन करून तक्रार करायची असल्याचे सांगितले. अखेर आज चाईल्ड हेल्प लाईन कार्यालयात जाऊन मुलीने आपबिती सांगितली आणि नंतर जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपी सतिष कानझोडे याच्या विरोधात पोक्सो आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास जवाहर नगर पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक पुरुषोत्तम राठोड करीत आहेत.