विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या २ बछड्यांची सुखरूप सुटका
तुमसर तालुक्यातील येरली येथील घटना
दैनिक लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- मौजा येरली येथील शेतकऱ्याच्या विहिरीत बिबट्याचे दोन बछडे पडल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने धाव घेऊन दोन्ही बछड्यांची सुखरूप सुटका केली. तपासणीनंतर दोन्ही बछडे सुदृढ असल्याचे स्पष्ट झाले असून परिसरात आईचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी मौजा येरली येथील कास्तकार श्री. दुर्गा बबनराव ठाकरे यांच्या मालकीच्या विहिरीत दोन बिबट्याचे बछडे पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी तुमसर सी. जी. रहांगडाले आणि आरआरटी टीम तुमसर घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या पथकाने स्थानिकांच्या मदतीने अत्यंत सावधगिरीने विहिरीत जाळे आणि दोर उतरवून दोन्ही बछड्यांना बाहेर काढले. पाण्यात पडल्याने बछडे घाबरले होते, मात्र कोणतीही दुखापत झालेली नव्हती. सुटका केल्यानंतर त्यांना तात्काळ तपासणीसाठी नेण्यात आले. पशुवैद्यकीय अधिकारी थोरात यांनी दोन्ही बछड्यांची तपासणी केली. तपासणीनंतर बछडे सुदृढ व सक्षम असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. त्यांना प्राथमिक उपचार देऊन निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने परिसरात आई बिबट्याचा शोध घेतला. बछडे मिळाल्यानंतर आई त्यांना घेऊन जाण्याची शक्यता असल्याने परिसरात लक्ष ठेवण्यात येत आहे.
ही संपूर्ण कारवाई मा. उपवनसंरक्षक भंडारा योगेंद्र सिंग सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी गडेगाव, क्षेत्र सहाय्यक तुमसर आर. डी. पालेवार साहेब, बीट रक्षक मोहगाव खदान आर. ए. वाघाडे, आरआरटी टीम तुमसर, विभागीय आरआरटी टीम भंडारा आणि जिवशास्त्रज्ञ शुभम मोदनकर भंडारा हे उपस्थित होते.
“गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात मानवी वस्तीजवळ वन्यप्राण्यांच्या वावरात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विहिरींना संरक्षक जाळी लावी आणि रात्रीच्या वेळी शेतात जाताना काळजी घ्यावी.”
– श्री सी. जी. रहांगडाले, वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर








