गोंदिया : फुलचूर ग्राम हादरले : रुग्णवाहिका चालकाची मध्यरात्री निर्घृण हत्या; कारंजा रोडवरील किसान चौकात रक्तरंजित थरार

दै.लो.वृत्तसेवा,गोंदिया:- गोंदिया शरालगतच्या फुलचूर परिसरात मंगळवारी घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जीव वाचविण्याचे कार्य करणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आल्याने परिसरात भीती, संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. कारंजा रोडवरील किसान चौकाजवळ विटभट्टा मार्गावर घडलेल्या या रक्तरंजित घटनेत अनमोल वसंत रंगारी (वय ३५, रा. बदरूटोला, कारंजा) यांचा जागीच मृत्यू झाला.
प्राप्त माहितीनुसार, अनमोल रंगारी हे रुग्णवाहिका चालक म्हणून कार्यरत होते. मंगळवारी मध्यरात्री ते किसान चौक परिसरात असताना अज्ञात आरोपीने त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. धारदार शस्त्राने डोक्यावर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते.
२३ जून रोजी सकाळी या घटनेची माहिती मिळताच गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिंगणजुडे यांच्या नेतृत्वाखालील पथक तातडीने घटनास्थल दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करून घटनास्थळाचा पंचनामा केला. हत्येच्या तपासासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे संकलित करण्यात आले आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
दरम्यान, हत्येमागील नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात असून वैयक्तिक वैमनस्य, जुना वाद अथवा इतर कोणता हेतू या सर्व शक्यतांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. आरोपी घटना घडल्यानंतर तत्काल पसार झाल्याने त्याच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
फुलचूर आणि कारंजा परिसरात या घटनेची चर्चा आज पहाटे पासून रंगत राहिली. समाजात मिसळून राहणारा आणि रुग्णसेवेशी निगडित असलेला तरुण अशा क्रूर हल्ल्याचा बळी ठरल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. एका कुटुंबाचा आधारवड क्षणात कोसळल्याने परिसर शोकसागरात बुडाला असून आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या सनसनाटी हत्याकांडचा पुढील तपास गोंदिया ग्रामीण पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू असून लवकरच या गुन्ह्याचा उलगडा होईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक सिंगणजुडे यांनी व्यक्त केला आहे.









