“कवडीमोल’ केसांचे झाले “ब्लॅक गोल्ड’
राहुल डोंगरे तुमसर (दै. लोकजन):सध्याच्या काळात टाकाऊ समजल्या जाणाऱ्या मानवी केसांनी अर्थकारणात एक नवी क्रांती घडवून आणली आहे. कचरा म्हणून फेकून दिले जाणारे केस आता “ब्लॅक गोल्ड’ (काळे सोने) म्हणून ओळखले जात असून, त्याला चक्क पाच हजार रुपये प्रतिकिलो असा विक्रमी भाव मिळत आहे. गावा गावात भोंगा लावुन दारा पर्यंत येणाऱ्या विक्रेत्यांच्या आवाजातून “तेराशे रुपये पाव २५०.ग्रॅम केस’ अशी आरोळी ऐकू येत असल्याने, आता घरोघरी कंगव्यातुन निघणारे केस साठवण्याचे फॅड वाढले आहे. केसांच्या वाढत्या किमतींमागे आंतरराष्ट्रीयबाजारातील वाढती मागणी आणि त्याचे बहुआयामी उपयोग हे मुख्य कारण आहे. चित्रपटसृष्टी, फॅशन इंडस्ट्री आणि मॉडेलिंग क्षेत्रासह सामान्य लोकांमध्येही विगचा वापर वाढला आहे.
सिंथेटिक केसांच्या तुलनेत नैसर्गिक मानवी केसांपासून बनवलेले विग अधिक टिकाऊ आणि नैसर्गिक वाटत असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय केसांची मोठी मागणी आहे. मानवी केसांमध्ये “केराटिन’ नावाचे प्रथिन असते. या गुणधर्मामुळेच टाकाऊ केसांपासून आता उत्कृष्ट दर्जाचे सेंद्रिय खत तयार केले जात आहे. विज्ञानाच्या प्रगतीमुळे केसांचा वापर आता पर्यावरणपूरक कामांसाठीही होऊ लागला आहे. समुद्रात होणारी खनिज तेलाची गळती रोखण्यासाठी केस एक नैसर्गिक शोषक म्हणून अत्यंत प्रभावी ठरत आहेत.








