देव्हाडी येथील सात दुकाने फोडणाऱ्या आरोपींना २४ तासांत अटक

✻ मुद्देमाल हस्तगत ✻ नवनियुक्त पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वाखाली पहिल्याच मोठ्या प्रकरणाचा छडा

दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर :- तुमसर रोड देव्हाडी रेल्वे स्थानकाजवळील सात दुकानांचे शटर फोडून चोरी करणाऱ्या आरोपींना तुमसर पोलिसांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. या कारवाइत चोरीला गेलेला रोख मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन तुमसरच्या हद्दीतील मौजा देव्हाडी येथे तुमसररोड रेल्वे स्टेशन परिसरातील दोन दुकाने व गांधी वार्ड देव्हाडी चौकातील दोन दुकानांचे शटर फोडून आरोपींनी गल्ल्यातील रोख रक्कम चोरली. तसेच गांधी वार्ड चौकातील तीन दुकानांचे शटर वाकवून चोरीचा प्रयत्न केला. या प्रकरणी तुमसर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला होता. आरोपींनी देव्हाडी येथील प्रमिला किसन सोनवणे (वय ५०) यांच्या पान टपरीचे शटर वाकवून गल्ल्यातील ५,००० रुपये व शेजारील रामू बंधाटे यांच्या दुकानातून ३०० रुपये असा ५,३०० रुपयांचा रोख ऐवज चोरला. रेल्वे स्टेशन परिसरातील शहरा यांच्या साईबाबा उपहारगृहातून १,२०० रुपये व कावळे ट्रेडर्समधून ५,००० रुपये चिल्लर, असा एकूण ६,२०० रुपये रोख रक्कम लंपास केली. गुन्हा नोंद होताच तुमसर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पो.हवा. शिवाजी कनोजिया, पो.शि. निखिल बिसने व डीबी पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. स्थानिकांच्या मदतीने रेल्वे स्थानक परिसरातून दोन आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींची नावे करण कन्हैय्या दुर्गा (वय २४, रा. कामठी) व १७ वर्षे १० महिन्यांचा विधी संघर्ष बालक (रा. कामठी, जि. नागपूर) अशी आहेत. दोघांनाही तुमसर पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेली नगदी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पुढील तपास स.पो.नि. आकाश कुमार साखरे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहाय्यक पोलीस अधीक्षक मयंक माधव व पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात सपोनि आकाश साखरे, डीबी पथक व पो.शि. गिरीपुंजे, बावने, दमाहे, झंजाड यांनी केली.

पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांनी नुकताच तुमसर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला असून त्यांच्या कार्यकाळातील ही पहिली मोठी उघडकीची कारवाई मानली जात आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. बारसे यांच्या आगमनानंतर पोलिसांच्या कारवाईच्या गतीत झालेल्या बदलाचीही चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. आगामी काळात बारसे यांच्या कारभाराकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *