१०० कोटी रुपये खर्चाचा बावनथडी पुलाच्या काम कासव गतीने

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- सन २०२४ मध्ये “नेत्यांनी फिती कापल्या, घोषणांचे नारळ फोळले … पण जनतेच्या नशिबी मात्र अजूनही वनवासच!” दिसून येतो.तुमसरकटंगी आंतर राज्यीय मार्गावरील बावनथडी नदीच्या पुला च्या बांधकामकारिता राज्य शासनातर्फे १०० कोटी रुपये चा निधी ३ वर्षांपूर्वीच २०२३ मध्ये मंजूर करण्यात आला. व त्याचे रीतसर भूमिपूजन होऊन तब्बल २ वर्षे झाले. मात्र आता अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी पुलाचे काम सुरू झाले. परंतु सदर पुलाचे काम इतक्या संथ गतीने सुरू आहे की, जणू हा पूल बनवायला आणखी १० वर्षे लागणार की काय असेच दिसून येते. प्रशासनाच्या या ‘कासवछाप’ कारभारामुळे गेल्या ५ वर्षांपासून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशचा संपर्क तुटला आहे.केवळ व्यापारच नव्हे तर दोन राज्यांतील रक्ताची आणि जिव्हाळ्याची नातीही आता कोमेजू लागली आहेत.

जनतेच्या या वेदनेला वाचा फोडत, सामाजिक कार्यकर्ते ठाकचंद मुंगुसमारे यांनी सुस्त प्रशासनाला थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. बावनथडी नदीवरील हा पूल केवळ सिमेंट-काँक्रीटचा खांब नाही, तर तो दोन राज्यांतील संस्कृती आणि कुटुंबांना जोडणारा पूल आहे. मात्र, ५ वर्षांपासून हा रस्ता बंद असल्याने सीमावर्ती भागातील नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. लग्नकार्य असो, सुख-दुःखाचा प्रसंग असो वा आपत्कालीन वैद्यकीय मदत… लोकांना मैलोनमैल वळसा घालून जावे लागत आहे.परिणामी व्यापार व सगे सोयरे दुरावल्या गेले. एकीकडे पुलाचे काम रखडलेले असताना, दुसरीकडे पाथरी येथे बनत असलेल्या ‘बॉक्स कलव्हर्ट’च्या (मोरी)कामात मोठा सावळागोंध सुरू आहे. या कलव्हर्टचा आकार इतका लहान आणि निकृष्ट दर्जाचा ठेवला जात आहे की, तिथून शेतकऱ्यांची बैलगाडी किंवा ट्रॅक्टर जाणेही अशक्य आहे.

हा थेट शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे. ज्या बांधकामाचा उपयोग सर्वसामान्य शेतकरी आणि वाहनचालकांना होणार नाही, ते काम तात्काळ थांबवावे, अशी मागणी मुंगुसमारे यांनी केली आहे. पाथरी येथील चुकीचे बांधकाम त्वरित थांबवून, पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू केले नाही, तर संपूर्ण तुमसर तालुका रस्त्यावर उतरेल. होणाऱ्या तीव्र आंदोलनाला आणि कायदासुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे अभियंता सुखदेवे आणि कडू मॅडम जबाबदार राहतील, असा इशाराही देण्यात आला आहे. आता तरी प्रशासनाची झोप उडणार की जनता आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *