गोंदिया: शास्त्री वॉर्डात अग्नीचा रौद्रावतार; बारदाना, प्लास्टिक व टाइल्सचे गोदाम ज्वाळांच्या विळख्यात

गोंदिया: शास्त्री वॉर्डात अग्नीचा रौद्रावतार; बारदाना, प्लास्टिक व टाइल्सचे गोदाम ज्वाळांच्या विळख्यातदै.लोकजन वृत्तसेवा गोंदिया :- शहरातील संजयनगर-गोविंदपूर परिसरातील शास्त्री वॉर्ड मंगळवारी सकाळी भीषण आगीच्या घटनेने हादरून गेला. सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास शैलेश अग्रवाल यांच्या बारदाना गोदामाला अचानक आग लागली आणि काही क्षणांतच तिने विक्राळ रूप धारण केले. उन्हाच्या तडाख्यात पेटलेल्या ज्वाळांनी आकाशाला गवसणी घातली, तर धुराचे काळेकुट्ट लोट दूरवरूनही स्पष्टपणे दिसत होते. या घटनेमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले. माहितीनुसार, गोदामात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बारदाना, पॅकिंग साहित्य, प्लास्टिक पाईप, टाइल्स आणि अन्य ज्वलनशील वस्तू साठवून ठेवण्यात आल्या होत्या. आग लागताच या साहित्याने पेट घेतल्याने ज्वाळांनी काही मिनिटांत संपूर्ण गोदामाला वेढा घातला.

आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, धुराचे लोट जवळपास एक किलोमीटर अंतरावरूनही दिसत होते. परिसरातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेत घटनास्थळाकडे गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच गोंदिया नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तब्बल पाच अग्निशमन बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले. अग्निशमन जवानांनी जीवाची पर्वा न करता ज्वाळांशी दोन हात करत आग पसरण्यापासून रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दुपारपर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरूच होते. आगीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याने पोलिस प्रशासनानेही तत्काळ बंदोबस्त तैनात केला. पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात ठेवत होते. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे.

गोदामातील बारदाना, प्लास्टिक साहित्य, पाईप, टाइल्स आणि इतर वस्तू पूर्णपणे जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शॉर्टसर्किट, उष्णतेचा परिणाम अथवा इतर कोणते तांत्रिक कारण यामागे असू शकते का, याबाबत विविध शक्यता वर्तविल्या जात आहेत. आग पूर्णपणे विझल्यानंतर तांत्रिक तपासणी आणि पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. या घटनेने शहरातील गोदामे, औद्योगिक आस्थापने आणि व्यावसायिक संकुलांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत ज्वलनशील साहित्य साठवणाऱ्या आस्थापनांनी अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *