तुमसर – रामटेक मार्गावर भरधाव ट्रक-बुलेरोचा भीषण अपघात
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- रामटेक-तुमसर राष्ट्रीय महामार्गावरील खापा शेतशिवारातील हसारा टर्निंग परिसर रविवारी दुपारी एका भीषण अपघाताने हादरून गेला. महिंद्रा बोलेरो आणि धानाने भरलेल्या ट्रकची समोरासमोर झालेली प्रचंड धडक इतकी भीषण होती की बोलेरोचा पुढील भाग अक्षरशः चकनाचूर झाला. या दुर्घटनेत बोलेरोमधील दोन प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, ६ जण गंभीर तर ५ किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये महिलांचाही समावेश असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर वैद्यकीय पथकाकडून उपचार सुरू आहेत.
हेमलाल राधेलाल वरकुडे (५६) रा. छिंदवाडा, भूताबाई भादुलाल सय्याम (६७) रा. छिंदवाडा असे या घटनेतील मृतकांची नावे आहेत. एकाचे नाव अद्याप कळले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्याकडून येणारी महिंद्रा बोलेरो (क्र. एमपी ०४ बीसी ०६१२) रामटेककडून तुमसरच्या दिशेने येत होती. त्याचवेळी तुमसरकडून रामटेकच्या दिशेने धान भरून जाणारा ट्रक (क्र. एमएच ३१ एपी ५६१७) समोरून येत होता. खापा शेतशिवारातील हसारा टर्निंगजवळ दोन्ही वाहनांमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघाताचा आवाज परिसरात घुमला आणि काही क्षणांतच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की बोलेरो वाहनाची दिशा बदलून ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले. दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा चुराडा झाला असून लोखंडी सांगाड्यात होते. अपघाताचे दृश्य पाहून उपस्थित नागरिकही सुन्न झाले.
घटनेची माहिती मिळताच तुमसर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, खापा आणि परिसरातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत मदतीचा हात पुढे केला. वाहनांमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी नागरिकांनी अथक प्रयत्न केले. त्यानंतर सुखदेव धुर्वे, उर्मिला धुर्वे, मनीलाल इरको, जितेंद्र धुर्वे, सुरेश धुर्वे, व धनलाल धुर्वे यांना तुमसर रुग्णालयातून जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले आहे. तर विजय भैय्यालाल धुर्वे, प्रमिला उईके, जयश्री गंगाजी पंधराम, खुर्शी सुखदेव धुर्वे, मिथुन परसराम वाढवे (बोलेरो चालक) हे किरकोळ जखमी आहेत. तुमसर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीयवैद्यकीय केंद्रात हलविण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती आणि काही जखमी हे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यात येत आहे. या भीषण अपघाताचा पुढील तपास तुमसर पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी करण्यात येत आहे. रविवारी दुपारच्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून महामार्ग सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.









