बावनथडीच्या कालव्यातुन ‘विषयुक्त पिवळसर’पाणी

 दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना सुललाम- सुफलाम करणाऱ्या बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यातुन उन्हाळी धान पीक ऐन बहरात असताना कालव्यातून पिवळसर, उग्र दर्प असलेले आणि रसायनयुक्त पाणी प्रवाहित होत असल्याने सुमारे साडेपाच हजार हेक्टरवरील पीक धोक्यात आले आहे. अज्ञात कारखानदारांनी आपले ‘पाप’ धुण्यासाठी कालव्याचा वापर केल्याचा दाट संशय असून, या प्रकारामुळे प्रशासनाविरुद्ध शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सध्या उन्हाळी हंगामातील धान पिके ‘ओब्यावर’ आहेत.

धान पिकासाठी हा काळ अत्यंत संवेदनशील मानला जातो. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून बावनथडीच्या कालव्यातून अचानक गडद पिवळसर आणि उग्र दुर्गंधी असलेले पाणी वाहू लागले आहे. हे विषारी पाणी थेट शेतात शिरल्याने उभ्या पिकाचे नुकसान होत असून, उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. सदर दुषित पाणी फक्त शेतीच नाही, तर आरोग्याला धोक्याचे आहे. सदर कालव्यातील दूषित पाण्याचे परिणाम केवळ पिकांपुरते मर्यादित नसून त्याचे स्वरूप भयावह आहे. रासायनिक पाण्यामुळे धानाचे दाणे भरण्याऐवजी ते ‘पोचट’ राहण्याची दाट शक्यता आहे. प्रवाहा व्दारे हेच पाणी नदी- नाल्यात मिसळत असल्याने पाळीव प्राणी आणि वन्यजीवांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.

सदर पाणी विषारी घटक जमिनीच्या पोटात झिरपल्याने भविष्यात विहिरी आणि कूपनलिकांचे पाणीही पिण्यायोग्य राहणार नाही. आता बावनथडी प्रकल्प प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन दोषींवर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत करून पीक जोपासले, मात्र आता शेवटच्या टप्प्यात प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती आहे. “सिंचनासाठी शुद्ध पाणी मिळणे अपेक्षित असताना सदर विषारी पिवळसर पाणी कालव्यात येते कुठून?” असा संतप्त सवाल तालुक्यातील शेतकऱ्यांनी विचारला आहे. येथे बावनथडी प्रकल्प अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत तर नाही ?असाही प्रश्न येथे उपस्थित होत आहे. सदर कालव्यातील पाण्याचे नमुने तातडीने घेऊन प्रयोगशाळेत तपासणी करावी व सांडपाणी सोडणाऱ्या दोषी कंपन्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. सदर दूषित पाण्याचा विसर्ग थांबवून तातडीने स्वच्छ पाणी सोडण्यात यावे .बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. सदर प्रकरणाची माहीती घेऊन चौकशी करतो. संबधित दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे मत बावनथडी प्रकल्प उपविभाग तुमसरचे शाखा अभियंता आर. आर. बडोले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *